बेपत्ता व्यक्तीचे झाडाला लटकलेले प्रेत आढळले
दै. लोकजन वृत्तसेवा तुमसरः- तालुक्यातील नाकाडोंगरी वनपरिक्षेत्रातील लोभी जंगलात एका झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत कुजलेला मृतदेह आढळून आल्याने सोमवारी परिसरात एकच खळबळ उडाली. मृत व्यक्तीचे नाव राजकुमार लेकचंद नेवारे (वय ३८, रा. आष्टी) असे असून तो मागील सुमारे १५ दिवसांपासून बेपत्ता होता, अशी माहिती समोर आली आहे.
सोमवारी जंगल परिसरात तीव्र दुर्गंधी येत असल्याने स्थानिक नागरिकांनी पाहणी केली असता झाडाला अडकलेल्या अवस्थेत कुजलेला मृतदेह दिसून आला. यानंतर तात्काळ पोलिसांना माहिती देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. प्राथमिक तपासात मृतक हा मनोरुग्ण असल्याचे निष्पन्न झाले असून, १७ मार्च रोजी गोबरवाही पोलीस ठाण्यात त्याच्या बेपत्ता असल्याची तक्रार कुटुंबीयांनी नोंदवली होती, अशी माहिती पोलिसांनी दिली.









