पाण्यासाठी टाकीवर चढून महिलांची “विरूगीरी’
दै. लोकजन वृत्तसेवा साकोली :- दोन वर्षांपासून बांधून ठेवलेल्या पाणीपुरवठा टाकीत अद्यापही पाणी नाही. त्यामुळे आज सोमवारी गट ग्रामपंचायत खैरलांजीतील सुमारे ३५ ते ४० महिलांनी पाण्याच्या टाकीवर चढून विरूगीरी करीत आंदोलन सुरू केले. येथे ग्रामस्थांनी टाकी बांधकामात प्रचंड भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करून प्रत्येक बांधकामांचे फोटो व्हिडिओ पुरावा असल्याचा दावा केला आहे.
शेवटी सरपंचांना येथे पाचारण केल्यावर आंदोलन मागे घेण्यात आले. खैरलांजी येथे ग्रामपंचायत व बांधकाम उपविभागाने जिल्हा परिषदेतर्फे २०२३-२४ ला ४० फूट उंच कोणतीही सुरक्षा आवरण न करता पाणी टाकी निर्माण केली. येथे पाच वेळाबोअरवेल करूनही निष्क्रिय ठरली. तेव्हापासून पाण्याचा हाहाकार होता. या भर उन्हाळ्यात पाण्याची टंचाई लक्षात घेऊन गावातील सुमारे ३५ ते ४० महिला हातात फलक घेऊन थेट पाणीटंकीवर चढून आंदोलन सुरू केले. पोलिस पाटील मेश्राम यांनी पोलिस ठाण्यात माहिती दिली. लगेच पोलिस घटनास्थळी आले. येथे अनेक ग्रामस्थांनी टाकी बांधकामात प्रचंड भ्रष्टाचार झाला, असा आरोप केला. त्यांचे फोटो, व्हिडिओ पुरावे जनतेने मोबाईल मध्ये रिकॉर्डिंग करून ठेवले आहेत. असा दावा केला.
याबाबत अनेकदा अंदाजपत्रक मागितले पण, ते सुद्धा दाखविले नाही असा संताप व्यक्त करीत या संपूर्ण बांधकामाची चौकशी करा अशी मागणी केली. महिलांनी येथे सरपंच येईपर्यंत टाकीवरून न उतरण्याचा पवित्रा घेतला. शेवटी सरपंच पूजा देशमुख आल्या. त्यांनी लवकरच पाण्याची व्यवस्था केली जाईल असे आश्वासन दिले व पोलिसांच्या मदतीने महिलांना पाणी टाकीवरून उतरविण्यात यश आले. या आंदोलनात चित्रा मेश्राम, कल्पना सूर्यवंशी, दिव्या हुमणे, शशिकला मुरकुटे, ललिता कुंभरे, सुधा बोरकर, भिमा वालदे, वंदना चंद्रीकापूरे, शशिकला शिवणकर, करिश्माउके, ममता गजभिये, मनिषा रूखमोडे, वर्षा चचाने, शीला पुरामकर, कांचन उके, डिलेश्वरी बोरकर, सत्यफुला कोल्हे, शारदा मेश्राम, किरण मेश्राम, वैशाली मेश्राम, निर्मला चंद्रीकापूरे, आस्था दिनकर, किरण गजभिये, चारूशिला मेश्राम, आशा राहुले यांच्यासह गावातील सुमारे ४० ते ४५ महिलांनी हे आंदोलन केले.









