भंडारा पोलीस दलाची शान असलेल्या श्वान “नॉटी’चे निधन
दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा ः- भंडारा पोलीस दलात आपल्या उल्लेखनीय कामगिरीचा ठसा उमटवणारा आणि सर्वांचा लाडका श्वान ‘नॉटी’ याचे आज अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्याच्या निधनाने भंडारा पोलीस दलावर शोककळा पसरली असून, पोलीस दलातर्फे त्याला शासकीय इतमामात आणि शोक सलामी देऊन अत्यंत जड अंतःकरणाने अखेरचा निरोप देण्यात आला.
श्वान नॉटी याचा जन्म ३० जानेवारी २०१५ रोजी झाला होता. त्यानंतर दि. २६ डिसेंबर २०१५ रोजी तो भंडारा पोलीस दलात अधिकृतपणे भरती झाला. पोलीस दलात रुजू झाल्यानंतर श्वान प्रशिक्षण केंद्र, पुणे येथे त्याने ९ महिन्यांचे खडतर आणिविशेष प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केले होते. या प्रशिक्षणाचा वापर त्याने पुढे भंडारा जिल्ह्यात गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी अत्यंत प्रभावीपणे केला. आपल्या सेवाकाळात नॉटीने अत्यंत चपळाईने आणि बुद्धिमत्तेने तब्बल १५ गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना मोलाची मदत केली. तसेच इतर ३३ गुन्ह्यांच्या तपासात त्याने अतिशय उत्कृष्ट कामगिरी बजावत पोलिसांच्या तपासाला योग्य दिशा दिली. केवळ गुन्ह्यांच्या तपासातच नव्हे, तर क्रीडा क्षेत्रातही नॉटीने आपल्या नावाची मोहोर उमटवली.
वर्ष २०१८ आणि २०१९ मध्ये नागपूर येथे पार पडलेल्या परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धेत त्याने सलग प्रथम क्रमांक पटकावला होता. तसेच, त्याने महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धेतही भंडारा जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करून लक्षवेधी सहभाग नोंदवला होता. त्याच्या या अष्टपैलू आणि चमकदार कार्यामुळे ‘नॉटी’ हाश्वान पोलीस दलात आणि नागरिकांमध्येही अत्यंत परिचीत झाला होता. आज त्याच्या निधनानंतर पार पडलेल्या अंत्यविधी कार्यक्रमादरम्यान भंडारा पोलिसांकडून त्याला सन्मानपूर्वक ‘शोक सलामी’ देण्यात आली. या अत्यंत भावपूर्ण प्रसंगी अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे, पोलीस उपअधीक्षक (गृह) आशिष गजभिये, जिल्हा विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक जितेंद्र बोरकर, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन चिंचोळकर आणि भंडारा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक उल्हास भुसारी तसेच संपुर्ण श्वान पथकाचे अंमलदार यांनी उपस्थित राहून श्वान ‘नॉटी’ याला पुष्पगुच्छ अर्पण केले व भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.









