मोहाडी नगरपंचायतची थकबाकीदारांवर धडक कारवाई

दै. लोकजन वृत्तसेवा मोहाडी :- नगर पंचायत मोहाडीने मालमत्ता कर थकबाकीदारांविरुद्ध २८ मार्च २०२६ रोजी धडक कारवाई करत अनेक व्यावसायिक दुकाने व काही निवासी मालमत्ता सील केल्या. या कारवाईमुळे शहरात खळबळ उडाली होती. मात्र दुसऱ्याच दिवशी रविवारी आमदार राजु कारेमोरे यांच्या उपस्थितीत काही व्यावसायिकांनी दुकानांना लावलेली सील तोडून दुकाने पुन्हा सुरू केली. त्यामुळे आता नगरपंचायत प्रशासन पुढे काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

नगरपंचायतीने वारंवार सूचना व नोटिसा देऊनही कर न भरणाऱ्या थकबाकीदारांविरुद्ध ही कारवाई हाती घेतली होती. प्रशासनाने विशेष मोहीम राबवूनथकबाकीदारांची यादी तयार केली होती. तसेच दवंडी देणे, वसुली पथके नेमणे अशा विविध उपाययोजना करून नागरिकांना कर भरण्याचे आवाहन करण्यात आले होते. मात्र अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने नियमानुसार जप्ती व सीलिंगची कारवाई करण्यात आली. या कारवाईदरम्यान शहरातील अनेक गाळ्यांना सील ठोकण्यात आले, तसेच काही ठिकाणी नळ कनेक्शनही तोडण्यात आले. थकबाकी वसुलीपर्यंत ही कारवाई कायम राहणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले होते.

मुख्याधिकाऱ्यांनी नागरिकांना आवाहन करत ३१ मार्चपूर्वी थकीत मालमत्ता कर व पाणी कर भरावा, अन्यथा कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल, असे सांगितले. दरम्यान, या कारवाईमुळे प्रभावित झालेल्या काही व्यावसायिकांनी आमदार राजु कारेमोरे यांच्याकडे धाव घेतली. त्यानंतर आमदार स्वतः घटनास्थळी दाखल झाले व त्यांच्या उपस्थितीत काही दुकानांचे सील तोडण्यात आले. त्यामुळे प्रशासनाच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.दरम्यान, दुकानाचे सील तोडण्याच्या घटनेनंतर नगरपंचायत प्रशासनाची पुढील भूमिका काय असेल, तसेच संबंधितांवर कायदेशीर कारवाई होणार का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. याबाबत मुख्याधिकारी यांच्याशी संपर्क केला असता संपर्क होऊ शकला नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *