जि.प.उपाध्यक्ष एकनाथ फेंडर यांची मागणी पूर्ण, आमरण उपोषण मागे
दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा ः- जिल्हा परिषदेच्या जनसुविधा योजनेच्या निधी वाटपात काही सदस्यांवर अन्याय होत असल्याचा गंभीर आरोप करून खुद्द जिल्हा परिषद उपाध्यक्ष एकनाथ फेंडर यांनीच दि. २७ मार्च रोजी जिल्हा परिषद कार्यालयाच्या वऱ्हांड्यातच आमरण उपोषण सुरू केले आहे.
आज त्यांच्या आमरण उपोषणाचा तिसरा दिवस आहे. त्यांची प्रकृती खालावली असून त्यांना केव्हाही रुग्णालयात भरती करावे लागणार आहे. एकनाथ फेंडर यांच्या आमरण उपोषणामुळे नागपूर विभागीय आयुक्त कार्यालयासह भंडारा जिल्हा प्रशासनात हलचल माजली आहे. यादीत बदल करण्याची प्रक्रिया सुरु झालीआहे. समसमान निधी वाटपाची यादी जोपर्यंत तयार होत नाही, तोपर्यंत आपण आमरण उपोषण सोडणार नसल्याचे उपाध्यक्ष एकनाथ फेंडर यांनी प्रस्तुत प्रतिनिधींशी बोलतांना सांगितले.
यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी राज्यमंत्री नानाभाऊ पंचबुद्धे, भाजपा जिल्हाध्यक्ष आशू गोंडाणे यांनी वरीष्ठ अधिकारी व लोकप्रतिनिधी यांच्याशी आज चर्चा केली. त्या चर्चेनंतर एकनाथ फेंडर यांची मागणी पूर्ण करण्यात आली. यामुळे त्यांनी नानाभाऊ पंचबुद्धे यांच्या हस्ते निंबूपाणी पिवून आमरण्ा उपोषण मागे घेतले. यावेळी काही जि. प. सदस्य, अधिकारी उपस्थित होते.









