संतप्त गावकऱ्यांनी पाच तास साकोली-तिरोडा मार्ग पाडला बंद
दै. लोकजन वृत्तसेवा साकोली :- उमरझरी येथील महिला शेतकरी माया सोनवाने यांच्यावर दिवसाढवळा वाघाने केलेल्या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्या. वन विभागाच्या वतीने जखमी माया सोनवाने हिच्यावर खाजगी उपचार न केल्यामुळे त्या कोमात गेल्यामुळे स्थानिक नागरिकांच्या संताप वाढला. माझी जिल्हा परिषद सदस्य नेपाल रंगारी यांच्या नेतृत्वात आज सकाळी ११ वाजेपासून चार वाजता पर्यंत साकोली तिरोडा मार्ग बंद करण्यात आला. प्रकरण अजून तापू नये याकरिता पोलीस विभागाच्या वतीने मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त तैनात केला.
यात उपविभागीय पोलीस अधिकारी शिवम विसापूर, साकोली पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक आशिष बोरकर, लाखनीचे पोलीस निरीक्षक सुभाष बारसे, दिघोरी, पालांदूरचे ठाणेदार उपस्थित होते. परंतु, साकोली तालुक्यात एवढी मोठी घटना घडल्यानंतरही वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी विभागीय वन अधिकारी योगेंद्रसिंह हे घटनास्थळावर न आल्यामुळे वातावरण अजून चिघळले. १९ मार्च रोजी बांपेवाडा येथील ५० वर्षीय वसंता मेश्राम यांच्यावर वाघिणीने हल्ला करून त्यांना ठार केले होते. या घटनेची शाई वाळते न वाळते तोच, २८ मार्च रोजी उमरझरी येथील ४८ वर्षीय माया रामकृष्ण सोनवाने यांच्यावर वाघिणीने भीषण हल्ला केला. या हल्ल्यात माया सोनवाने गंभीर जखमी झाल्या असून त्यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याचे वैद्यकीय सूत्रांकडून सांगण्यात आले आहे. एकामागून एक होत असलेल्या या प्राणघातक हल्ल्यांमुळे संपूर्ण परिसरात नरभक्षक वाघिणीची मोठी दहशत निर्माण झाली आहे. वाघिणीचा वावर असलेला व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण अधिकच गडद झाले आहे.
जखमी माया सोनवाने यांना वेळेत मदत आणि उपचार न मिळाल्याचा आरोप करत ग्रामस्थांचा संयम सुटला. संतप्त नागरिकांनी माजी जि. प. सदस्य नेपाल रंगारी यांच्या नेतृत्वात प्रशासनाविरोधात घोषणाबाजी करत साकोली-तिरोडा मार्ग पूर्णपणे बंद केला. आंदोलनादरम्यान संतप्त जमावाने जाळपोळही केली, ज्यामुळे परिसरात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. जोपर्यंत या नरभक्षक वाघिणीचा बंदोबस्त होत नाही आणि पीडित कुटुंबांना न्याय मिळत नाही, तोपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला आहे.
वन विभागाने वाघिणीला जेरबंद करण्यासाठी कंबर कसली आहे. परिसरात तातडीने पिंजरा लावण्यात आला असून विशेषरेस्क्यू टीम पाचारण करण्यात आली आहे. वाघिणीवर लक्ष ठेवण्यासाठी परिसरात तात्पुरता टॉवर उभारण्याचे काम सुरू आहे. तसेच, नरभक्षक वाघीण दिसताच तिला ट्रॅंक्विलायझर गनद्वारे बेशुद्ध करून पकडण्याचे स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत. वाघिणीला पकडण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा आणि ड्रोनचा वापर करण्याबाबतही हालचाली सुरू आहेत.
वन विभागाच्या वतीने सहायक वन संरक्षक संजय मेंढे, सहायक वन संरक्षक मनीषा चव्हाण हे उपस्थित होते व यांनी नेपाल रंगारी तथा आंदोलनकर्त्यांनी केलेली मागणी पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. यात जखमी माया सोनवाने यांना खाजगी रुग्णालयात वन विभागाच्या वतीने औषधोपचार, वन विभागाच्या वतीने आर्थिक मदत, मागील दोन वर्षापासून साकोली तिरोडा मार्गावर बंद असलेली जड वाहतूक सुरू तथा जंगल व्याप्त भागातील संपूर्ण शेतशिवाराला तारेचे कुंपण अशा विभिन्न मागण्या वन विभागाच्या वतीने मंजूर करण्यात आल्या. तसेच या प्रकरणात दोषी वनपरिक्षेत्र अधिकारी नितेश धनविजय यांना तात्काळ निलंबित करण्याची मागणी सुद्धा आंदोलकांच्या वतीने करण्यात आली









