पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांचे आश्वासनानंतर जि.प.उपाध्यक्ष एकनाथ फेंडर यांचे आमरण उपोषण मागे

*निधी वाटपात भेदभाव केला जाणार नाही
काशिनाथ ढोमणे
भंडारा :- जिल्हा परिषदेच्या जनसुविधा योजनेच्या निधी वाटपात काही सदस्यांवर अन्याय केला जात असल्याचा गंभीर आरोप करून खुद्द जिल्हा परिषद उपाध्यक्ष एकनाथ फेंडर यांनी जिल्हा परिषद प्रशासना विरोधात दि. २७ मार्च रोजी जिल्हा परिषद कार्यालयाच्या व-हांड्यातच आमरण उपोषण सुरू केले होते. आज त्यांच्या आमरण उपोषणाचा तिसरा दिवस होता. त्यांची प्रकृती खालावली होती. पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी याची दखल घेतली. कोणत्याही सदस्यांवर निधी वाटपात अन्याय होणार नाही असे आश्वासन पालकमंत्री यांनी दिले. यानंतर पालकमंत्री यांचे प्रतिनिधी म्हणून भाजपचे जिल्हाध्यक्ष आशू गोंडाणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी राज्यमंत्री नानाभाऊ पंचबुद्धे यांनी उपोषणकर्ते एकनाथ फेंडर यांना लिंबूपाणी पाजून तिसऱ्या दिवशी आमरण उपोषण सोडवले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपा पदाधिकारी, जि. प. सदस्य तथा जि. प. अधिकारी उपस्थित होते.
जिल्हा परिषदेचे दुसरे सवोर्त्तम पदाधिकारी उपाध्यक्ष एकनाथ फेंडर यांच्या आमरण उपोषणामुळे नागपूर विभागीय आयुक्त कार्यालयासह भंडारा जिल्हा प्रशासनात खळबळ माजली होती . यामुळे त्यांनी मागणी केल्यानुसार जि. प. फंड वाटप यादीत बदल करण्याची प्रक्रिया सुरु झाली.
समसमान निधी वाटपाची यादी जोपर्यंत तयार होत नाही, तोपर्यंत आपण आमरण उपोषण सोडणार नसल्याचे आज दुपारी उपाध्यक्ष एकनाथ फेंडर म्हणाले होते. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी राज्यमंत्री नानाभाऊ पंचबुद्धे, पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांचे प्रतिनिधी म्हणून भाजपा जिल्हाध्यक्ष आशू गोंडाणे यांनी आज चर्चा केली. त्या चर्चेनंतर एकनाथ फेंडर यांची मागणी पूर्ण करण्यात आली. यामुळे त्यांनी नानाभाऊ पंचबुद्धे व आशू गोंडाणे यांच्या हस्ते निंबूपाणी प्राशन करून आमरण उपोषण मागे घेतले.









