जिल्हा परिषद उपाध्यक्ष एकनाथ फेंडर यांचे जि. प. पायऱ्यावरच जिल्हा परिषदेच्या विरोधातचआमरण उपोषण सुरू
ग्रामपंचायत निधी वाटपात जिल्हा परिषदेचा भोंगळ कारभार
काशिनाथ ढोमणे
भंडारा :- जनसामान्य योजनेच्या कामासाठी ग्रामपंचायतला निधी वाटप करतांना जिल्हा परिषद प्रशासनाकडून भेदभाव केल्या जात असल्याने भंडारा जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष एकनाथ फेंडर यांनी आज जिल्हा परिषद कार्यालयाच्या मुख्य गेटसमोरच आमरण उपोषण सुरु केले आहे. यामुळे जिल्हा परिषदेचा भोंगळ कारभार पुढे आला आहे.
उपोषणाबाबतीत माहिती देतांना जि. प. उपाध्यक्ष एकनाथ फेंडर म्हणाले, जनसामान्य योजनेसाठी शासनाकडे साडे सतरा करोड रुपयाची मागणी करण्यात आली होती. पाठपुराव्यानंतर शासनाकडून साडे अकरा करोड रुपये प्राप्त आले. हा निधी ग्रामपंचायतला वाटप करतांना जिल्हा परिषदेत मोठ्या प्रमाणात भोंगळ कारभार करण्यात आला आहे. काल जिल्हा परिषदेने पंचायत समिती व ग्रामपंचायतला जी यादी पाठवली. त्यात काही ग्रामपंचायत अवाढव्य निधी, काही अल्प निधी तर काही ग्रामपंचायतला शून्य निधी देण्यात आला आहे. याचा निषेध म्हणून व सर्वसाधारण सभेत ठरल्याप्रमाणे सर्व ग्रामपंचायतला समसमान निधी देण्यात यावा या मागणीसाठी जिल्हा परिषद उपाध्यक्ष एकनाथ फेंडर यांनी आज दि. २७ मार्च २०२६ पासून जिल्हा परिषद गेटसमोर आमरण उपोषण सुरु केले आहे.
आपण जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) व जि. प. अध्यक्षांना भ्रमणध्वनीवरून फोन करून कुणालाही शून्य निधी देऊ नये अशी विनंती केली. मात्र त्यांनी आमची मागणी घुडकावल्यासारखी केली आहे. पालकमंत्री डॉ. पंकज भोयर, जिल्हाधिकारी सावन कुमार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वरीष्ठ पदाधिकान्यांना यांना याबाबतीत माहिती दिली आहे. जास्त दिवस नसल्याने ही यादी दोन दिवसात फायनल होणार आहे. आमच्या जवळ पर्याय नसल्याने शेवटचा उपाय म्हणून आमरण उपोषणावर बसण्याचा निर्णय घेतला आहे, असेही ते म्हणाले.
विशेष म्हणजे उपाध्यक्ष एकनाथ फेंडर, जि. प. सदस्य सुषमा पारधी, नंदा झंझाड यासह २५ सदस्यांच्या क्षेत्रातील ग्रामपंचायतला अल्पसा निधी दिला आहे.









