विधी सेवा समितीमार्फत जनजागृती शिबिराचे आयोजन

दै. लोकजन वृत्तसेवा मोहाडीः- महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या दिनदर्शिका २०२६ तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, भंडारा यांच्या निर्देशानुसार दिनांक २४ मार्च २०२६ रोजी तालुका विधी सेवा समिती, मोहाडी यांच्या वतीने पोलीस स्टेशन आंधळगाव येथे कायदेविषयक जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात जागतिक जल दिन (२२ मार्च) निमित्त पाणी साठवण (वॉटर हार्वेस्टिंग) व पाणी संवर्धन, प्रदूषणमुक्त पाणी व हवा हा मूलभूत हक्क, तसेच अन्न व शिक्षणाचा हक्क याबाबत जनजागृती करण्यात आली. तसेच पर्यायी वाद निवारण पद्धती व त्याचे फायदे, नागरिकांची मूलभूत कर्तव्ये यावर मार्गदर्शन करण्यात आले.

नालसा च्या राष्ट्रीय विधी सहाय्य हेल्पलाईन क्रमांक व पोर्टलची माहितीही उपस्थितांना देण्यात आली. याशिवाय “ड्रग अवेअरनेस अँड वेलनेस नेव्हिगेशन (ऊअथछ)’ योजना २०२५ अंतर्गत व्यसनमुक्त भारतासाठी जनजागृती, तसेच “घर घर में न्याय की जागृती’ या उपक्रमांतर्गत कायदेविषयक जागरूकता निर्माण करण्यावर भर देण्यात आला. सर्वोच्च न्यायालयाच्या सतेन्द्र कुमार अंटील विरुद्ध केंद्रीय अन्वेषण विभाग प्रकरणातील जामीन संदर्भातील निर्देशांची माहितीही यावेळी देण्यात आली. कार्यक्रमात ॲड. आर. एस. देशमुख व ॲड. डि. ए. निमजे यांनी विविध विषयांवर सविस्तर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पी.एल.व्ही./ विधी स्वयंसेवक रविंद्र उदाराम थोटे यांनी केले, तर आभार प्रदर्शन पोलीस निरीक्षक नितीन राठोड यांनी केले. या शिबिरास पोलीस स्टेशन आंधळगावचे अधिकारी व कर्मचारी यांच्यासह एकूण १८ जण उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *