सात प्रयत्नांनंतर यश, जयेश भारतीय लष्करात लेफ्टनंट देशसेवेचा ध्यास: भंडाऱ्याच्या सुपुत्राची कामगिरी

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा:- अपयशावर मात करत सातत्याने प्रयत्न करणाऱ्यांसाठी जयेश क्षीरसागर यांची यशोगाथा प्रेरणादायी ठरत आहे. भंडारा येथील जयेश यांनी भारतीय लष्करात अधिकारी होण्याचे स्वप्न अखेर साकार केले. ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमी, गया येथे पार पडलेल्या पासिंग आऊट परेडनंतर त्यांना “लेफ्टनंट’ पद बहाल करण्यात आले.

जयेश यांचे शालेय शिक्षण लाल बहादूर शास्त्री विद्यालय, भंडारा येथे झाले. त्यांनी नागपूर येथील यशवंतराव चव्हाण अभियांत्रिकी महाविद्यालयातून अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण केले. लहानपणापासूनच सैन्यात अधिकारी होण्याची जिद्द मनात ठेवून त्यांनी सातत्याने मेहनत घेतली. अधिकारी होण्यासाठीच्या कठीण प्रक्रियेत सुरुवातीचे सहाप्रयत्न अपयशी ठरले. मात्र त्यांनी हार न मानता सातत्य कायम ठेवले. अखेर सातव्या प्रयत्नात त्यांनी यश संपादन करत आपल्या ध्येयाला गवसणी घातली. त्यांच्या या यशामुळे कुटुंबीयांसह जिल्ह्यात आनंदाचे वातावरण आहे. पासिंग आऊट परेडला उपस्थित असलेल्या आई-वडिलांनी अभिमान व्यक्त केला. जयेश यांनी देशसेवा हीच सर्वोच्च प्रेरणा असल्याचे सांगत प्रामाणिकपणे कर्तव्य पार पाडण्याचा निर्धार व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *