चांदपूर बस बंदमुळे श्रीराम नवमी उत्सवावर विरजण पडले
दै. लोकजन वृत्तसेवा सिहोरा :- तुमसर चांदपूर बस फेरी बंद झाल्यामुळे श्रीराम नवमीे उत्सव यात्रेवर चांगलेच विरजण पडले आहे. श्रीराम नवमी उत्सव व यात्रेकरूचे हित लक्षात घेता चांदपूर बस फेरी सिहोरा ते गोबर वाही फाटा मार्गे मुरलीवरून सुरू करण्यात यावी अशी मागणी यात्रेकरू व परिसरातील नागरिकांनी केली आहे. लोक प्रतिनिधींनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे. गोंदेखारी ते चुल्हाड बस स्थानक सिमेंट रस्त्याचे काम सुरू असल्यामुळे ८ ते १० दिवसापासून तुमसर ते चांदपूर बस फेरी बंद करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. यात यात्रेकरू व प्रवासी चांगलेच अडचणीत आले आहेत.
परिणामी मुदतसंपलेल्या काळी पिवळीने जीव घेणे प्रवास सुरू असल्याचे वृत्त पुढे आले आहे. इंग्रज कालीन चांदपूर देवस्थान हे भंडारा जिल्ह्यातच नव्हे तर विदर्भात सुद्धा प्रसिद्ध असून हनुमंताच्या दर्शनासाठी मध्यप्रदेश व छत्तीसगड वरून भाविक भक्त येथे दर्शनासाठी येतात. येथे लंगडा मारोती व ऋषी देवाचे मंदिर दर्शनीय व प्रेक्षणीय स्थान आहे. चांदपूर देवस्थानात ८ दिवसा पासूनच श्रीराम नवमी उत्सवाची धूम सुरू असून दररोज भाविक भक्त दर्शनासाठी येत आहेत. सिहोरा ते गोबरवाही फाटा मार्गे चांदपूर बस फेरी सुरू झाल्यास या बसचा भाविक भक्त तसेच चांदपूर, टेमनी, मोहाडी खापा, गोंदेखारी व लगतच असलेल्या मांगली येथील प्रवासांना सुद्धा याचा लाभ घेता येईल. सिहोरा, मांगली व चांदपूर हा प्रवास अडचणीचा असून दुचाकी व काळी पिवळी साठी धोक्याचा ठरत आहे. ग्रीन व्हॅली चांदपुर व चांदपूरच्या उंच टेकडीवर असलेल्या जागृत हनुमंताचे दर्शन घेण्यासाठी भाविक भक्तांची येथे नेहमीच रेलचेल असते. भाविक भक्तांना व प्रवाशांना सोयीचे ठरेल यासाठी तुमसर व तिरोडा आगारातून बस फेऱ्या सुरू करण्यात आल्या होत्या. आता ह्या बस फेऱ्या बंद झाल्यामुळे भाविक भक्तांना चुल्हाड व सिहोरा बस स्थानकावरच उतरून ५ ते ७ किलोमीटरचा अंतर पायी गाठावे लागत आहे. यात प्रवाशांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. प्रवाशांचे व भाविक भक्तांचे हित लक्षात घेता सिहोरा ते गोबरवाई फाटा मार्गे चांदपुर बस सुरू करण्यात यावी अशी मागणी होत असून याकडे लोकप्रतिनिधींचे सुद्धा लक्ष वेधले जात आहे.









