भंडारा जिल्ह्यात महसूल विभागातील ७ अधिकाऱ्यांवर कारवाई
दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- दिव्यांगत्वाचे बोगस प्रमाणपत्र सादर करून शासकीय नोकरीत शिरकाव करणाऱ्या भंडारा महसूल प्रशासनातील ७ अधिकाऱ्यांवर बडतर्फ तसेच निलंबनाची कारवाई करण्यात आल्याने प्रशासनात प्रचंड खळबळ उडाली आहे. महसूल विभागातील एकूण २२ दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या प्रमाणपत्रांची नागपूर वैद्यकीय मंडळामार्फत पुनर्तपासणी करण्यात आली होती. त्यापैकी ७ अधिकाऱ्यांची प्रमाणपत्रे बोगस निष्पन्न झाल्यानंतर बोगस प्रमाणपत्राद्वारे नोकरी मिळवल्याचा ठपका ठेवत तीन अधिकाऱ्यांना बडतर्फ तर तीन जणांना निलंबित करण्यात आले आहे. यात तीन तलाठी, एक मंडळ अधिकारी, दोन सहाय्यक महसूल अधिकारी यांचा समावेश आहे.
शिवाय भंडारा येथील नायब तहसीलदार हट्टेवार यांना बडतर्फ करण्यासंदर्भात जिल्हा निवड समितीच्यावतीने शासनाला प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव तुकाराम मेंढे यांच्या आदेशान्वये संपूर्ण राज्याप्रमाणेच भंडारा जिल्ह्यातील शासकीय नोकरी मिळिवलेल्या ३२२ दिव्यांगांसह प्रमाणपत्रांची पडताळणी सुरू झाली. दिव्यांग व्यक्तींचे हक्क (सुधारणा) नियम, २०१६ नुसार बोगस प्रमाणपत्रांची विशेष समितीमार्फत चौकशी करण्यात येते. भंडारा जिल्हा प्रशासनातील बोगस दिव्यांगत्वाच्या विषयाला गांभीयनि घेत जिल्हा निवड समितीची स्थापना करण्यात आली. या पुनर्तपासणीतून दिव्यांगत्व जास्त दाखविणे, दिव्यांग नसताना बोगस प्रमाणपत्राच्या आधारे नोकरी मिळविणाऱ्या बोगस दिव्यांगांचा पर्दाफाश होण्यास सुरुवात झाली आहे.
जिल्ह्यात महसूल विभागातकार्यरत असलेल्या २२ दिव्यांगांपैकी ७ जणांनी दिव्यांगात्वाचे बोगस प्रमाणपत्र सादर केल्याचे उघड झाले असून त्यावर प्रशासनाने आता कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. जिल्हा प्रशासनाने केलेल्या या कारवाईमुळे जिल्ह्यातील बोगस दिव्यांगांचे धाबे दणाणले आहेत. दिव्यांगांसाठी असलेले लाभ फसवणुकीने मिळवणे हा गुन्हा आहे. यामुळे शासनाची फसवणूक होते आणि खन्या दिव्यांग व्यक्तींना त्यांच्या हक्काच्या लाभांपासून वंचित राहावे लागते. दिव्यांगांसाठीच्या लाभांचा गैरवापर करणाऱ्यां विरोधात धडक कारवाई सुरू करण्यात आली आहे असे जिल्हाधिकारी सावन कुमार, यांनी सांगितले.









