दिवसा ८ तास वीज फक्त नावालाच

दै. लोकजन वृत्तसेवा तुमसर :- एकीकडे शासनाकडून शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्याच्या गप्पा मारल्या जात असताना, दुसरीकडे प्रत्यक्षात मात्र वीज वितरण कंपनीच्या ढिसाळ कारभारामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. “दिवसा ८ तास वीज देऊन काय फायदा त्यातले २-३ तास तर फक्त “फेज’ उडण्यात आणि “ट्रिपिंग’ मध्येच जातात, “असा संतप्त सवाल आता शेतकरी बांधव विचारत आहेत.

शेतकऱ्यांनी मांडलेल्या तक्रारीनुसार, दिवसा मिळणाऱ्या वीज पुरवठ्यात अजिबात “करंट’ (व्होल्टेज) नसतो. कमी दाबाच्या वीज पुरवठ्यामुळे शेतातील विद्युतपंप पुरेसे पाणी खेचू शकत नाहीत. इतकेच नव्हे तर, वारंवार होणाऱ्या चढ-उतारामुळे महागड्या मोटारी जळून खाक होत आहेत. यामुळे शेतकऱ्यांना दुहेरी आर्थिक फटका बसत असून हाताशी आलेले पीक डोळ्यादेखत करपून जात आहे. शेतकऱ्यांची स्पष्ट मागणी आहे की, जर दिवसा पुरेसा दाब मिळत नसेल, तर किमान १२ तास वीज पुरवठा करण्यात यावा. दिवसाची ८ तासांची वेळ ही केवळ कागदावरच असून तांत्रिक बिघाडामुळे प्रत्यक्ष वापर अत्यंत कमी होतो. “दिवसा नीट वीज देता येत नसेल, तर किमान रात्रीचावीज पुरवठा तरी सुरळीत ठेवा, अन्यथा शेतीचा नुकसान झाल्याशिवाय राहणार नाही,” अशा भावना शेतकरी व्यक्त करत आहेत. विजेच्या लपंडावामुळे सिंचनाचे वेळापत्रक पूर्णपणे कोलमडले आहे. एकीकडे निसर्गाची साथ नाही आणि दुसरीकडे वीज मंडळाचा हा जाच, अशा कात्रीत बळीराजा अडकला आहे. या गंभीर प्रश्नावर प्रशासनाने तात्काळ लक्ष देऊन वीज पुरवठ्यात सुधारणा करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा जांब, आंधळगाव, काटेबम्हणी, मोहाडी व तुमसर तालुक्यातील शेतकऱ्यांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *