पीक कर्ज परतफेड ३१ मार्चची पूर्वी करा
दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा ः- भंडारा जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि सेवा सहकारी संस्थांच्या सर्व शेतकरी सभासदांनी ३१ मार्च २०२६ पूर्वी आपल्या खरीप पीक कर्जाचा भरणा करावा, असे आवाहन बँकेचे अध्यक्ष सुनीलभाऊ फुंडे यांनी केले आहे. वेळेत कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना पुढील आर्थिक वर्षात नवीन कर्ज मिळण्याचा मार्ग मोकळा होणार असून, शासनाच्या विविध योजनांचा लाभही घेता येणार आहे.
महाराष्ट्र शासनाने सुरूकेलेल्या परमपूज्य राजमाता अहिल्यादेवी होळकर कर्ज मुक्ती योजनेअंतर्गत विविध सवलतीआणि लाभ जाहीर केले आहेत. या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी चालू कर्जाची परतफेड ३१ मार्चपर्यंत करणे अनिवार्य आहे. जे शेतकरी या मुदतीत आपल्या कर्जाचा भरणा करतील, तेच या योजनेसाठी पात्र ठरतील, असे बँकेतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. शेतकऱ्यांच्या सुविधेसाठी भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आपल्या पूर्ण क्षमतेसह सेवा देण्यासाठी सज्ज आहे. सुट्ट्या आणि संभाव्य गर्दी लक्षात घेऊन बँकेने योग्य नियोजन केले असून, शेतकरी सभासदांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी कर्मचारी तत्पर राहणार आहेत.









