भावेश कोटांगले यांना राज्यस्तरीय व्यसनमुक्ती पुरस्कार जाहीर

 दै. लोकजन वृत्तसेवा साकोली:- महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत दिला जाणारा राष्ट्रपिता महात्मा गांधी राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार (सन २०२२-२३) यंदा साकोली तालुक्यातील एकोडी येथील प्रबोधनकार, कवी, गायक, संगीतकार, कलावंत, व ग्रा. पं. सदस्य भावेश कोटांगले यांना जाहीर झाला आहे. व्यसनमुक्ती क्षेत्रात त्यांनी केलेल्या सातत्यपूर्ण, निष्ठावान आणि प्रभावी कार्याची दखल घेत शासनाने हा प्रतिष्ठेचा सन्मान जाहीर केला आहे.

हा पुरस्कार दि.२६ मार्च २०२६ रोजी मुंबई येथील नरिमन पाईंट जवळील यशवंतराव सभागृहात आयोजित विशेष समारंभात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, ॲड. राहुल बोंद्रे, माधुरी मिसाळ आणि संजय शिरसाट यांच्या प्रमुख उपस्थितीत व हस्ते प्रदान करण्यात येणारआहे. पुरस्काराचे स्वरूप १५ हजार रु. रोख, शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह असे असून या यशामुळे भावेश कोटांगले यांच्या कार्याचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. त्यांच्या या सन्मानामुळे व्यसनमुक्ती क्षेत्रात कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांना नवी प्रेरणा मिळणार आहे. राज्य शासनाकडून दिला जाणारा हा पुरस्कार व्यसनमुक्ती क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना दिला जातो.

समाजातील व्यसनाधीनतेच्या वाढत्या समस्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी कार्य करणाऱ्याकार्यकर्त्यांना प्रोत्साहन देण्याचा हा एक महत्त्वाचा उपक्रम मानला जातो. भावेश कोटांगले यांनी गेल्या काही वर्षांपासून व्यसनमुक्तीच्या क्षेत्रात सक्रिय भूमिका बजावत अनेक उपक्रम राबवले आहेत. त्यांनी गावोगावी जाऊन जनजागृती मोहीम राबवली, व्यसनाधीन व्यक्तींना समुपदेशनाद्वारे मार्गदर्शन केले तसेच त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी प्रयत्न केले. अनेक तरुणांना व्यसनाच्या विळख्यातून बाहेर काढून त्यांना नवे आयुष्य मिळवून देण्यात त्यांनी मोलाची भूमिका बजावली आहे. त्यांच्या कार्यामुळे अनेक कुटुंबांचे तुटलेले संसार पुन्हा उभे राहिले आहेत. दरम्यान, राज्यभरातून त्यांच्या अभिनंदनाचा वर्षाव होत असून सामाजिक, राजकीय आणि स्वयंसेवी क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी त्यांच्या कार्याचे कौतुक केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *