गॅस टंचाईत लोखंडी बादलीतील “इलेक्ट्रिक शेगडी’ ठरतेय वरदान
दै. लोकजन वृत्तसेवा तुमसर:- तुमसर तालुक्यातील खापा गावातील एका तरुणाच्या कल्पकतेमुळे गॅस टंचाईच्या काळात अनेक कुटुंबांना मोठा दिलासा मिळत आहे. घरगुती गॅस सिलिंडरच्या वाढत्या किमती आणि अधूनमधून जाणवणाऱ्या टंचाईच्या पार्श्वभूमीवर खापा येथील अण्णा शंकर वैद्य या तरुणाने लोखंडी बादलीत तयार केलेली “इलेक्ट्रिक कोळसा शेगडी’ सध्या परिसरात चर्चेचा विषय ठरली आहे.
साध्या साहित्याचा वापर करून तयार केलेली ही देशी जुगाड शेगडी आता अनेकांच्या स्वयंपाकघरात स्थान मिळवत आहे. सध्या जागतिक स्तरावर युद्धजन्य परिस्थितीमुळे जीवनावश्यक वस्तूंवर परिणाम जाणवू लागला आहे. गॅस सिलिंडरच्या किमती सातत्याने वाढत असल्याने सामान्य नागरिकांचे घरगुती बजेटविस्कळीत होत आहे. अशा परिस्थितीत अण्णा वैद्य यांनी स्वस्त, टिकाऊ आणि उपयोगी पर्याय म्हणून ही शेगडी तयार केली आहे. या शेगडीची रचना अत्यंत सोपी आणि परिणामकारक आहे. मजबूत लोखंडी बादलीमध्ये सिमेंटच्या साहाय्याने चुलीचा आकार देण्यात आला आहे. त्याला एक लहान इलेक्ट्रिक ब्लोअर (पंखा) जोडण्यात आला आहे, जो विद्युत प्रवाहावर चालतो. या शेगडीत लाकडी कोळसा वापरला जातो. ब्लोअरमुळे कोळशाला सतत हवा मिळते आणि तो कमी वेळात पूर्ण क्षमतेने पेटतो. त्यामुळे स्वयंपाक जलद आणि सोप्या पद्धतीने करता येतो. या शेगडीमुळे गॅस सिलिंडर संपण्याची भीती मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. इलेक्ट्रिक हवेमुळे विस्तव लवकर पेटतो आणि स्वयंपाक झटपट तयार होतो.
विशेष म्हणजे दोन वेळचे जेवण अगदी कमी कोळशात तयार होत असल्याने गॅसवरील खर्चातही बचत होते. त्यामुळे ग्रामीण भागातील अनेक गृहिणी या शेगडीकडे आकर्षित होत आहेत. “गॅसच्या वाढत्या किमतींमुळे मध्यमवर्गीय कुटुंबांना घरखर्च सांभाळणे कठीण होत होते. या शेगडीमुळे स्वयंपाक करणे सोपे झाले असून गॅसची टंचाई आता फारशी जाणवतनाही,’ असे एका ग्राहकाने सांगितले. गॅसच्या वाढत्या किमतींच्या पार्श्वभूमीवर खर्चात बचत आणि कामात वेग देणारी ही शेगडी ग्रामीण भागातील कुटुंबांसाठी खऱ्या अर्थाने उपयुक्त पर्याय ठरत असल्याचे चित्र सध्या तुमसर तालुक्यात दिसून येत आहे.









