राष्ट्रीय लोकअदालतीत तुमसर न्यायालयातील २७८ प्रकरणे निकाली

 दै. लोकजन वृत्तसेवा तुमसर:- न्यायालयीन प्रकरणांच्या जलद निपटाऱ्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय लोकअदालतीत तुमसर न्यायालयाने उल्लेखनीय कामगिरी करत २७८ प्रकरणे तडजोडीच्या माध्यमातून निकाली काढली. या प्रक्रियेतून १४ लाख ७० हजार ५६९ रुपयांचा दंड वसूल करण्यात आला असून संबंधित पक्षकारांना मोठा दिलासा मिळाला. ही लोकअदालत राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या निर्देशानुसार तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, भंडारा यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवारी (१४ मार्च) आयोजित करण्यात आली.

लोकअदालतीचे कामकाज पॅनल प्रमुख आर. पी. बाठे (दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, तुमसर) यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले. त्यांना पॅनल सदस्य ॲड. व्ही. एल. दुबे यांनी सहकार्य केले. या लोकअदालतीसाठी दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर, तुमसर येथील २५८ प्रकरणे, विविध बँकांची ८५७ प्रकरणे, महावितरणची १३२ प्रकरणे तसेच ग्रामपंचायत कार्यालयाची १००५ प्रकरणे अशी एकूण २२५२ प्रकरणे सुनावणीसाठी ठेवण्यात आली होती. त्यापैकी तडजोडीच्या माध्यमातून २७८ प्रकरणांचा यशस्वी निपटारा करण्यात आला. निकाली काढलेल्या प्रकरणांमध्ये बँक वसुलीची २, ग्रामपंचायतीची १५३, न्यायालयातील प्रलंबित एन. आय. ॲक्टची ४, दिवाणी दावे ७ तसेच गुन्हा कबुलीची ११४ प्रकरणे यांचा समावेश आहे. वर्षानुवर्षे न्यायालयात प्रलंबित असलेले वाद अल्पावधीत तडजोडीने निकाली निघाल्यामुळे संबंधित पक्षकारांमध्ये समाधानाचे वातावरण दिसून आले.

लोकअदालतीच्या यशस्वी आयोजनासाठी वकील संघ, तुमसर येथील पदाधिकारी व अधिवक्त्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. या आयोजनासाठी न्यायालयीन कर्मचाऱ्यांपैकी सहाय्यक अधीक्षक जे. एन. चकोले, लघुलेखक पी. एम. वेळेकर, ए. ए. डोंगरे, व्ही. एस. वानखेडे, एम. एस. हुमणे, आशिष सूर्यवंशी तसेच शिपाई एस. एस. जामोदे यांनी विशेष परिश्रम घेतले. राष्ट्रीय लोकअदालतीमुळे न्यायालयीन प्रकरणांचा वेगवान, सुलभ व कमी खर्चात निपटारा होतो. त्यामुळे नागरिकांचा वेळ व पैसा वाचत असून न्यायव्यवस्थेवरील ताणही कमी होण्यास मदत होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *