भूमिपूजन की लोकार्पण नागरिकांत संभ्रम

दै. लोकजन वृत्तसेवा साकोली :- साकोली शेंदूरवाफा अंतर्गत पाणीपुरवठा योजनेचे काम ७० टक्के पेक्षा पूर्ण झाले असून आता काही दिवसात लोकार्पण सोहळा व्हावा व हर घर नल ही योजना लवकर सुरू व्हावी अशी जनतेची बऱ्याच दिवसापासून मागणी होती परंतु या योजनेचे ७० टक्के काम पूर्ण झाल्यावर सत्ताधारी पक्षाच्या वतीने भूमिपूजन सोहळा आयोजित करण्यात आला त्यामुळे ही योजना सुरू होईल की नाही याबाबत जनतेत संभ्रम निर्माण झाला आहे त्यामुळे या भूमिपूजन सोहळ्याला काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकांनी अनुपस्थिती दाखवून याच्या विरोध केला. साकोली-सेंदुरवाफा नगरपरिषद अंतर्गत राबविण्यात येत असलेल्या पाणीपुरवठा योजनेच्या कामाचे जवळपास निम्म्यापेक्षा अधिक काम पूर्णझाल्यानंतर अचानक भूमिपूजन कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याने शहरात आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

या पार्श्वभूमीवर साकोली-सेंदुरवाफा नगरपरिषदेमधील काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकांनी सदर कार्यक्रमास अनुपस्थित राहून तीव्र नाराजी व्यक्त केली. नगरपरिषदेकडून आयोजित कार्यक्रमानुसार साकोलीसेंदुरवाफा पाणीपुरवठा योजनेचेभूमिपूजन तसेच प्रधानमंत्री आवास योजनेच्या कामांचा कार्यक्रम शनिवार, दिनांक १४ मार्च २०२६ रोजी मंगलमूर्ती सभागृह येथे आयोजित करण्यात आला होता. मात्र प्रत्यक्षात पाणीपुरवठा योजनेचे काम यापूर्वीच मोठ्या प्रमाणात सुरू असून जवळपास निम्मे काम पूर्ण झाल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. या संदर्भात प्रतिक्रिया देताना प्रभाग क्र. ५ चे नगरसेवक तथा गटनेता इंजि. संदीप बावनकुळे म्हणाले की, “जनतेच्या पैशातून होणाऱ्या विकासकामांचा आम्हाला नेहमीच अभिमान आहे, कामे कोणत्याही नेत्यांनी आणावे आम्ही नेहमी साकोली /सेंदुरवाफा नगर परिषदेच्या विकास कामाकरिता सोबत राहू. मात्र काम सुरू होऊन मोठ्याप्रमाणात पूर्ण झाल्यानंतर भूमिपूजन करण्याची ही पद्धत जनतेच्या भावना दुखावणारी आहे.

साकोली शहरातील नागरिकांना वास्तव माहिती असताना अशा प्रकारचे दिखावू कार्यक्रम घेणे योग्य नाही. विकासाच्या नावाखाली राजकारण करण्यापेक्षा प्रत्यक्ष कामांवर लक्ष देणे अधिक गरजेचे आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणे आम्हाला योग्य वाटले नाही.’ तसेच नगरसेविका तथा स्थायी समितीच्या उपाध्यक्ष स्मिता सिडाम यांनीही तीव्र भावना व्यक्त करत सांगितले की, साकोली शहरातील जनतेने आम्हाला विश्वासाने निवडून दिले आहे. त्यांच्या भावनांचा आणि विश्वासाचा आदर राखणे ही आमची जबाबदारी आहे. आधी काम करायचे आणि नंतर त्याचे भूमिपूजन करायचे ही पद्धत महाराष्ट्रात कुठेही पाहायला मिळत नाही.

हा प्रकार जनतेची दिशाभूल करणारा वाटतो. त्यामुळे जनतेच्या भावना लक्षात घेऊन आम्ही या कार्यक्रमाला अनुपस्थित राहण्याचा निर्णय घेतला. काँग्रेसच्या नगरसेवकांच्या मते, राज्यात आजपर्यंत कुठेही एखाद्या योजनेचे निम्म्यापेक्षा जास्त काम पूर्ण झाल्यानंतर भूमिपूजन केल्याचे उदाहरण आढळत नाही. त्यामुळे अशा प्रकारच्या कार्यक्रमामुळे शहरात राजकीय व सामाजिक चर्चेला उधाण आले आहे. दरम्यान, या घटनेमुळे साकोली-सेंदुरवाफा नगरपरिषद परिसरात राजकीय वातावरण तापले असून नागरिकांमध्येही या निर्णयाबाबत विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. काम आधी सुरू झाले आणि नंतर भूमिपूजन करण्यात येत असल्याने नेमका उद्देश काय? असा सवालही शहरातील नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *