आखाती देशांतील युद्धाची गादिया- भंडारा राईस मिल उद्योगाला झळ; निर्यात ठप्प, कोट्यवधी रुपयांचा तांदूळ अडकला
गोंदिया :- आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाचे परिणाम आता देशांतर्गत उद्योगांवरही स्पष्टपणे दिसू लागले आहेत. पूर्व विदर्भातील महत्त्वाचा मानला जाणारा राईस मिल उद्योग या परिस्थितीमुळे गंभीर संकटात सापडला आहे. गोंदिया जिल्हा “राईस सिटी’ म्हणून ओळखला जातो. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर भात गिरण्या असून त्यावर हजारो कामगार आणि त्यांच्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह अवलंबून आहे.
मात्र युद्धामुळे तांदळाच्या निर्यातीवर मोठा परिणाम झाला असून गेल्या पंधरा दिवसांपासून आखाती देशांकडे जाणारी तांदळाची निर्यात पूर्णपणे ठप्प झाली आहे. पूर्व विदर्भात १११० राईस मिल पूर्व विदर्भातील गोंदिया, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर आणि नागपूर या पाच जिल्ह्यांमध्ये मिळून सुमारे १११० राईस मिल कार्यरत आहेत. यापैकी गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक भात गिरण्या आहेत. या भागात उत्पादित होणाऱ्या उष्णा तांदळाची देशांतर्गत बाजारपेठेबरोबरच आंतरराष्ट्रीय बाजारात मोठी मागणी आहे. विशेषतः इराण, कतार, सौदी अरेबिया, इस्त्रायल आणि दक्षिण आफ्रिका या देशांमध्ये येथून मोठ्या प्रमाणात तांदळाची निर्यात केली जाते. मात्र सध्या सुरू असलेल्या युद्ध परिस्थितीमुळे या देशांकडे जाणारी निर्यात पूर्णपणे थांबली आहे. कंटेनर जेएनपीटीत अडकले निर्यात थांबल्यामुळे आधीच पाठविण्यात आलेले शेकडो कंटेनर मुंबईतील जेएनपीटी बंदरात अडकून पडले आहेत. परिणामी व्यापाऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे व्यवहार ठप्प झाले असून मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होतआहे. याचबरोबर निर्यात थांबल्यामुळे स्थानिक बाजारपेठेत तांदळाचा पुरवठा वाढला असून दरात मोठी घसरण झाली आहे. खरेदीदार नसल्याने व्यापाऱ्यांपुढे माल साठवून ठेवण्याची वेळ आली आहे.









