नगर परिषदेत जनता दरबार घेणारे पहिले नगराध्यक्ष इंजि. सागर गभने
दै. लोकजन वृत्तसेवा तुमसर ः- सामान्य नागरिकांच्या समस्या थेट ऐकून त्यांचे निराकरण करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेला जनता दरबार हा उपक्रम तुमसर नगर परिषदेत प्रथमच राबविण्यात आला. विशेष म्हणजे तुमसर नगर परिषदेत जनता दरबार घेणारे पहिले नगराध्यक्ष म्हणून इंजि. सागर गभने यांची नोंद झाली आहे.
या उपक्रमामुळे प्रशासन आणि जनतेतील संवाद अधिक दृढ झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. सोमवार, १० मार्च रोजी आयोजित करण्यात आलेल्या या जनता दरबारात नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्या समस्या मांडल्या.शहरातील अतिक्रमण, स्वच्छता, पिण्याचे पाणी, रस्ते, नाली व्यवस्था, पथदिवे, कर आणि इतर मूलभूत सुविधांशी संबंधित प्रश्न नागरिकांनी मांडले. अनेक तक्रारींचा जागेवरच निपटारा करण्यात आला, तर काही प्रकरणांवर तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या. या जनता दरबारात १०० हून अधिक प्रकरणांचा निपटारा करण्यात आला. त्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त करत हा उपक्रम लोकाभिमुख प्रशासनाचा उत्तम नमुना असल्याचे मत व्यक्त केले.
यावेळी नगराध्यक्ष इंजि. सागर गभने यांनी सांगितले, “लोकांनी माझ्यावर दाखवलेला विश्वास ही मोठी जबाबदारी आहे. प्रत्येक नागरिकाच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न करत आहोत. हा केवळ एक कार्यक्रम नसून शहराच्या विकासाच्या नव्या पर्वाची सुरुवात आहे.’ दरम्यान, तुमसर नगर परिषदेत प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या या जनता दरबारामुळे नागरिकांना थेट प्रशासनाशी संवाद साधण्याचे व्यासपीठ मिळाले असून शहराच्या विकासाला नवी दिशा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.






