सरकारने काळजी घेतलीय, घरगुती गॅस कुठेही कमी पडणार नाही; केंद्रीयमंत्री मोहोळांनी दिली माहिती, काय म्हणाले?
पुणे:- इराण आणि अमेरिका, इस्रायलच्या युद्धाचे जगातील विविध देशांवर परिणाम झाले असून आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीमुळे इंधन आणि गॅस पुरवठ्यावर त्याचा परिणाम झाला आहे. भारतात गेल्या काही दिवसांत गॅसचा पुरवठा घटल्याने हॉटेल व्यवसायिकांचे धाबे दणाणले आहेत. गॅसच्या तुटवड्यामुळे पुण्यात १० हजारांपेक्षा जास्त लग्नसोहळे पुढे ढकलण्यात आल्याची माहिती आहे.
यासंदर्भात आता पुण्याचे सुपुत्र आणि केंद्रीयमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी माहिती दिली. देशात सुरू असलेल्या घरगुती गॅसच्या तुटवड्यांसदर्भात भारत सरकारने १०० टक्के काळजी घेतली आहे. देशभरात व्यावसायिक गॅस दिला जातो, तो थांबवला आहे आणि कमी केलाय. घरगुती गॅस म्हणून प्राधान्य दिल जात आहे, घरगुती गॅस कुठेही कमी पडणार नाही याची काळजी सरकार घेत आहे. त्यामुळे, याची चिंता करण्याचं कारण नाही, असे केंद्रीयमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी म्हटलंय. गॅस एजन्सीकडून काळाबाजार होत असल्याच्या गोष्टी कानावर येत आहेत, त्याची दखल घेतली जाईल. घरगुती गॅस कुठेही कमी पडणार नाही याची काळजी सरकार घेत आहे.
युद्धजन्य परिस्थितीमुळे जी परिस्थिती निर्माण झाली आहे, त्यामुळे आपल्याला हा निर्णय घ्यावा लागला. त्यासाठी, काही काळ जावा लागेल. मात्र, घरगुती गॅस कमी पडणार नाही, असेही मुरलीधर मोहोळ यांनी स्पष्ट केले. दरम्यान, आखाती देशात सुरू असलेल्या युद्धामुळे भारतातील गॅस वितरणावर थेट परिणाम झाला असून देशासह राज्यात अनेक ठिकाणी घरगुती गॅस ग्राहकांनी दुकानांच्या बाहेर गर्दी केली आहे. मात्र, नाशिकच्या येवल्यात वेगळं चित्र आहे. सध्या गॅस वितरण व्यवस्था सुरळीत सुरू असून ओटीपी प्रणाली राबवल्यामुळे घरगुती ग्राहकांना वेळेत गॅस मिळत आहे. त्यामुळे ग्राहकांची सध्यातरी दुकानांवर रांगा दिसतनसल्याची माहिती येथील वितरकांनी दिली आहे.






