संपूर्ण धान खरेदी पुर्ण होईपर्यंत उद्दिष्ट वाढवून द्या

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा ः- धान उत्पादक शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमी दर मिळू नये, यासाठी शासनाच्या वतीने जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी मार्केटिंग फेडरेशन अंतर्गत शासकीय केंद्रावरून धान खरेदी केली जाते. मात्र उद्दिष्ट वाढवून न मिळाल्याने भंडारा- गोंदिया जिल्ह्यातील अनेक शेतकरी धान विक्रीपासून वंचित झाले आहेत. या पार्श्वभुमीवर भंडारा- गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांनी धान खरेदीचे उद्दीष्ट वाढवून देण्याची आग्रही मागणी करत संसद परिसरात आंदोलन केले.

याबद्दल बोलताना खासदार डॉ. प्रशांत पडोळे म्हणाले की, माझ्या मतदारसंघात दोन्ही जिल्ह्यातील संपुर्ण धान खरेदी होतील, एवढे वाढीव उद्दिष्ट मिळाले तरच सर्व शेतकऱ्यांचे धान खरेदी होतील, त्यामुळे उद्दिष्ट वाढवून देण्यात यावे अशी आग्रही मागणी केली. यापूर्वी या संदर्भात केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंग चव्हाण यांना पत्र लिहिले होते. मात्र त्यावर काहीही कार्यवाही झाली नाही. आज भंडारा जिल्ह्यात शेतकऱ्यांचे जवळपास ३० लाख क्विंटल तर गोंदिया जिल्ह्यात १५ लाख क्विंटल धान खरेदी केंद्रावर उद्दिष्टे नसल्यामुळे पडून आहेत.

याची कुठलीही नोंद शासनाकडे नाही. सरकार उद्दिष्ट वाढवल्याचा दावा करत आहे. मात्र प्रत्यक्षात शेतकऱ्यांकडून खरेदी होत नाही. धान विक्री केल्यानंतरही दीर्घकाळ सरकारकडून पैसे मिळत नाही. त्यामुळे सरकारकडून उशिरा पैसे मिळवण्यापेक्षा व्यापाऱ्याकडून कमी मात्र लवकर पैसे मिळवणे हा शेतकऱ्यांचा प्रयत्न असतो. बोनस देखील शेतकऱ्यांना पाहिजे तेवढे दिले जात नाही. मूळात शेतकऱ्यांच्या धानाला चांगला भाव मिळणे अपेक्षित आहे आणि शेतकऱ्यांना मिळणारे पैसे देखील वेळेवर मिळणे आवश्यक आहे, असेही डॉ. प्रशांत पडोळे म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *