जिल्हा परिषद शाळेत शिक्षकांच्या भरतीसाठी जि. प. पदाधिकाऱ्यांचे साखळी उपोषण सुरु
दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा ः- भंडारा जिल्ह्यांतर्गत कार्यरत जिल्हा परिषद शाळांमधील मोठ्या प्रमाणात रिक्त शिक्षकांची पदे विशेष मोहिमेमार्फत भरण्यात यावे या मागणीसाठी जिल्हा परिषद शिक्षण समिती सभापती नरेश ईश्वरकर यांच्या नेतृत्वात जि. प. पदाधिकाऱ्यांनी आज दि. १० मार्च २०२६ पासून जिल्हा परिषदेसमोर साखळी उपोषण सुरु केले. विशेष म्हणजे, या साखळी उपोषणास सरपंच संघटनेने पाठिंबा जाहीर केला आहे. यावेळी शिक्षक भरतीचा तोडगा निघेपर्यंत सर्व शासकीय कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याचा इशारा यावेळी जि. प. पदाधिकाऱ्यंांनी दिला.
भंडारा जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदेमार्फत प्राथमिक व माध्यमिक शाळा ७६१ वहायस्कुल तथा कनिष्ठ महाविद्यालय ३२ आहेत. यातमध्यम व गरीब कुटूंबातील ७० हजाराच्यावर विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. महाराष्ट्र बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क नियम २०११ नुसार विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळणे आवश्यक आहे. तथापि, राज्यामध्ये बहुतांश जिल्हा परिषदेच्या शाळा असलेल्या भंडारा जिल्ह्यात चार महिन्यापूर्वी पवित्र पोर्टलद्वारे नाममात्र शिक्षक पदे भरण्यात आली. सद्यास्थितीत विविधसंवर्गातील ८७६ शिक्षकांची पदे रिक्त असल्यामुळे विद्यार्थ्यांचेमोठे नुकसान होत आहे. ही पुरोगामी महाराष्ट्राकरीता लाजीरवाणी बाब आहे.
सुरु असलेल्या अर्थसंकल्पिय अधिवेशनामध्ये ८७६ शिक्षकांची रिक्त पदे तात्काळ भरण्यासाठी मंजुरी देवून तशी घोषणा करावी अन्यथा जिल्हा परिषदेचे सर्व पदाधिकारीव सदस्य दि. १० मार्च २०२६ पासून जिल्हा परिषद मुख्यालयासमोर आमरण उपोषणास बसतील असा इशारा जि. प. शिक्षण समिती सभापती नरेश ईश्वरकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविलेल्या पत्रातून करण्यात आला होता. मात्र, अर्धे अधिवेशन संपल्यानंतरही त्या पत्राकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने जिल्हा पदाधिकारी व सदस्य यांनीआजपासून साखळी उपोषण सुरु केले आहे. जि. प. अध्यक्ष कविता उईके, जि. प. शिक्षण समिती सभापती नरेश ईश्वरकर, सभापती शितल राऊन, सभापती अनिता नलगोपुलवार, सभापती आनंद मलेवार यांच्यासह सदस्य उपोषणावर बसले आहेत.







