समानता हाच मानवी जीवनाचा पाया-डॉ. भगत

दै. लोकजन वृत्तसेवा तुमसर ः- “समानता हाच मानवी जीवनाचा खरा पाया आहे. समतेचे तत्व अंगीकारणे हेच मानवाचे वेगळेपण आहे.’ असे प्रतिपादन एस. एन. मोर महाविद्यालयाचे कार्यकारी प्राचार्य डॉ राहुल भगत यांनी केले. गोंदिया शिक्षण संस्थेद्वारा संचलित सेठ नरसिंगदास मोर कला, वाणिज्य व श्रीमती गोदावरीदेवी सराफ विज्ञान महाविद्यालयामधील महिला कक्षाच्या वतीने नुकताच जागतिक महिला दिवस साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे कार्यकारी प्राचार्य डॉ राहुल भगत हे उपस्थित होते. तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ भारती काटेखाये, डॉ आरती साळवे, डॉ अरुणा बावनकर व डॉ रेणुकादास उबाळे हे उपस्थित होते. आपल्या भाषणात डॉ भगत पुढे म्हणाले की, ‘स्त्रीपुरुषांमध्ये काही नैसर्गिक व जैविक भेद असले तरी विचारशीलता, बौद्धिक क्षमता व कार्यक्षमता यामध्ये कोणताच भेद असत नाही. परंतु सामाजिक संरचनेमध्ये स्त्रियांना दुय्यम वागणूक दिली जाते. हे पूर्णतः गैर आहे. आजच्या तरुणांनी आपल्या जीवनात कोणत्याही प्रकारचा स्त्री-पुरुष भेदभाव करता कामा नये.’ याप्रसंगी डॉ आरती साळवे म्हणाल्या की, ‘जागतिक पटलावर स्त्रियांना आपल्या अधिकारासाठी मोठा संघर्ष करावा लागला आहे.

या संघर्षाची जाणीव ठेवून प्रत्येक स्त्रीने न डगमगता आपल्या ध्येयापर्यंत वाटचाल करावी.’ यावेळी डॉ रेणुकादास उबाळे आपल्या भाषणात म्हणाले की, ‘स्त्रीपुरुष विषमतेचा प्रश्न हा केवळ स्त्रियांचाच प्रश्न नसून अनेक भिन्नलिंगीय समूहांचा व एकंदर समाजाचा तो प्रश्न आहे. त्यामुळे त्याची सोडवणूक करण्यामध्ये पुरुषांनी सुद्धा पुढाकार घ्यायला हवा. आपल्या वैयक्तिक व सामाजिक जीवनामध्ये समानतेने व विवेकाने वर्तन करायला हवे.’ या कार्यक्रमात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतीराव फुले, डॉ बाबासाहेब आंबेडकर, ताराबाई शिंदे आदी महामानवांच्या विचारकार्याला उजाळा देण्यात आला. यावेळी महाविद्यालयातील महिला कर्मचाऱ्यांचा सत्कार देखील करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. रितूबाई तुरकर यांनी केले. तर डॉ अरुणा बावनकर यांनी आभार मानले. यावेळी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *