तुडका येथील फादर अग्नल शाळेच्या अनधिकृत बांधकामावर कारवाईची मागणी
दै. लोकजन वृत्तसेवा तुमसर ः- तुमसर तालुक्यातील मौजा तुडका येथे विद्यासागर मंडळाच्या अंतर्गत असलेल्या फादर अग्नल शाळेच्या बांधकामाबाबत मोठा वाद निर्माण झाला असून शासनाच्या कोट्यवधी रुपयांच्या महसुलाला फटका बसल्याचा आरोप करण्यात आला आहे. या संदर्भात माजी आमदार तथा राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे जिल्हाध्यक्ष चरण वाघमारे यांनी जिल्हाधिकारी सावन कुमार यांना निवेदन देत शाळेच्या अनधिकृत बांधकामावर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे. निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, संबंधित फादर अग्नल शाळा ही ग्रामपंचायत तुडका यांच्या गावठाण क्षेत्रात नसून गावठाणाबाहेरील क्षेत्रात येते.
महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ च्या कलम ५२/१(२) नुसार गावठाणाबाहेरील क्षेत्रात कोणतेही बांधकाम करण्यापूर्वी जिल्हाधिकारी किंवा त्यांच्या अधिकाराने नियुक्त तहसीलदार दर्जाच्या अधिकाऱ्यांची पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक आहे. मात्र शाळेच्या मुख्याध्यापकांनी शाळेच्या बांधकामासंदर्भात उपविभागीय अधिकारी (प्रांत) तुमसर, तहसीलदार तुमसर तसेच पंचायत समिती कार्यालय तुमसर येथे कोणतीही परवानगी किंवा कागदपत्रे सादर केलेली नसल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे सदर बांधकाम हे कायद्याच्या दृष्टीने अनधिकृत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणाची चौकशी पंचायत समिती तुमसरच्या गटविकास अधिकाऱ्यांकडून करण्यात आली असून त्यांच्या अहवालातही शाळेने बांधकामासाठी कोणतीही पूर्वपरवानगी घेतली नसल्याचे स्पष्ट झाल्याचे सांगण्यात आले आहे. प
रिणामी शासनाचा ‘कर’ स्वरूपातील कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडाल्याचा आरोपही करण्यात आला आहे. गावठाणाबाहेरील अनधिकृत बांधकाम हटविण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना असल्याने या प्रकरणाची सखोल चौकशी करून फादर अग्नल शाळेवर योग्य ती कारवाई करावी, तसेच अनधिकृत बांधकाम हटविण्याची कार्यवाही करावी, अशी मागणी चरण वाघमारे यांनी निवेदनातून केली आहे. यावेळी स्वराज्य युवा एकता फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अमित मेश्राम, योगेश रंगवानी, चंद्रशेखर भिवगडे, मधुकर चौधरी उपस्थित होते. दरम्यान, या गंभीर आरोपांमुळे तुमसर तालुक्यातील शैक्षणिक व प्रशासकीय वतुर्ळात खळबळ उडाली असून प्रशासन याबाबत कोणती भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.








