शिक्षण हक्काच्या लढाईत योगेश रंगवानी यांना उच्च न्यायालयाचा दिलासा
दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा ः- “जेथे स्थानिक प्रशासन आणि राज्य सरकार सर्वसामान्यांचे हक्क जपण्यात अपयशी ठरते, तेथे केवळ माननीय न्यायालयच संविधानाचे खरे रक्षक म्हणून धावून येते,” अशा शब्दांत तुमसर येथील सामाजिक कार्यकर्ते योगेश रंगवानी यांनी भंडारा येथे विश्रामगृहात घेतलेल्या पत्रपरिषदेत आपल्या भावना व्यक्त केल्या.
यावेळी माजी आमदार तथा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष चरण वाघमारे, शहर अध्यक्ष मधुकर चौधरी, चंद्रशेखर भिवगडे उपस्थित होते. रंगवानी पुढे म्हणाले, तुमसर येथील फादर एग्नेल स्कूलमधील अतिरिक्त शुल्कवाढीच्या विरोधात आवाज उठवल्यामुळे, सूडबुद्धीने त्यांच्या अल्पवयीन मुलीचे (कु. चित्राक्षी योगेश रंगवानी) प्रवेशरद्द करून तिला शाळेतून बाहेर काढण्यात आले होते.
या अन्यायाविरुद्ध रंगवानी यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात धाव घेतली होती. माननीय न्यायालयाने या प्रकरणाची गंभीर दखल घेत शाळेने दिलेले टी.सी. रद्द करून, मुलीला तात्काळ प्रवेश देण्याचे आणि कोणतेही दंडात्मक शुल्क न घेण्याचे ऐतिहासिक आदेश दिले आहेत. या लढाईत मला मिळालेल्या राजकीय आणि सामाजिक पाठबळाबद्दल मी अत्यंत ऋणी आहे. माजी आमदार तथा जिल्हाध्यक्ष चरण भाऊ वाघमारे यांनी या प्रश्नावर मला खंबीर साथदिली. तसेच, पक्षाचे सभागृहातील ज्येष्ठ नेते आमदार जयंत पाटील साहेब यांनी या विषयाचे गांभीर्य ओळखून राज्य सरकारला विविध निवेदने दिली आणि प्रशासनाला जागृत करण्याचा सातत्याने प्रयत्न केला.
या दोन्ही नेत्यांनी दाखवलेल्या तत्परतेबद्दल आणि सहकार्याबद्दल त्यांनी आभार मानले. रंगवानी पुढे म्हणाले की, “मी जेव्हा जनसामान्यांच्या हितासाठी शाळा प्रशासनाशी चर्चा करत होतो, तेव्हा हे प्रकरण वैयक्तिक आकसापोटी माझ्या मुलीपर्यंत नेण्यात आले. दुर्दैवाची बाब म्हणजे, एका अल्पवयीन विद्यार्थिनीची बाजू समजून घेण्याऐवाजी, काही सत्ताधारी पक्षाचे नेते आणि स्थानिकप्रशासकीय अधिकाऱ्यांनी शाळा प्रशासनाचीच पाठराखण केली. प्रशासनाने वेळीच योग्य बाजू घेतली असती, तर न्यायाला उशीर झाला नसता. या निकालाने सिद्ध केले की, लोकप्रतिनिधी आणि राज्य सरकार कमी पडले तरी न्यायालय न्याय जिवंत ठेवते.” न्यायालयाच्या या निर्णयामुळे केवळ चित्राक्षीलाच नव्हे, तर शुल्कवाढीचा त्रास सोसणाऱ्या राज्यातील हजारो पालकांना एक आशेचा किरण मिळाला आहे. “काही काळ मी या प्रसंगामुळे खचलो होतो, परंतु न्यायदेवतेने मला पुन्हा बळ दिले आहे. यापुढेही मी समाजसेवा आणि जनसामान्यांच्या प्रश्नांसाठी लढण्यात कधीही मागे राहणार नाही,” असा निर्धार तुमसरचे सामाजिक कार्यकर्ता योगेश रंगवानी यांनी व्यक्त केला.








