घरगुती गॅसचे दर ६० रुपयांनी वाढले, इंधन तुटवडा; मुख्यमंत्री देवाभाऊंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, पॅनिक तयार करू नका

मुंबई:- राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी युद्धजन्य परिस्थितीमुळे देशात, राज्यात गॅस आणि इंधनाचा तुटवडा होत असल्यासंदर्भात भूमिका मांडली. यावेळी, घरगुती गॅस सिलेंडरच्या ६० रुपयांच्या दरवाढीसंदर्भातील प्रश्नावरही त्यांनी उत्तर दिले. घरगुती गॅसचे दर ६० रुपयांनी वाढले आहेत. यासंदर्भात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं की, लोकांमध्ये चुकीची माहिती देऊन पॅनिक तयार करू नका, भारत सरकारने अतिशय स्पष्टपणे या संदर्भातली भूमिका मांडली आहे. भारताच्या एनर्जी सिक्युरिटीच्या संदर्भात कशाप्रकारे मोदीजींनी पाऊल उचलली आहेत हे आपल्यासमोर आलेलं आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.

अमेरिका, इस्रायल आणि इराणमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे जागतिक पातळीवर परिणाम होत असून, त्याचा फटका भारतालाही बसत आहे. सध्या देशात एलपीजी गॅसची तुटवड्याची परिस्थिती जाणवत आहे, आणि याचा सर्वात मोठा परिणाम हॉटेल उद्योगावर झाला आहे. कमर्शियल एलपीजी गॅसचे दर अचानक १५० ते २०० रुपयांनी वाढले आहेत.त्यामुळे हॉटेल व्यवसाय पुढे कसा चालवायचा, हा प्रश्न व्यवसायिकांसमोर उभा राहिला आहे. दुसरीकडे घरगुती गॅसच्या दरातही ६० रुपयांची वाढ झाल्याने सर्वसामान्यांच्या घराचे गणित बिघडले आहे. त्यातच, गॅस सप्लायही काही शहरांत बंद पडल्याचे पाहायला मिळते. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारणा केली असता, असा कुठलाही प्रकार नाही, माध्यमांनी लोकांना पॅनिक करू नये, भारत सरकारने याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे, असे सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *