समृद्धी महामार्गासाठी शेती संपादनाबाबत खा. डॉ. प्रशांत पडोळे यांनी घेतली आढावा बैठक
दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- भंडारा जिल्ह्यातून जाणाऱ्या समृद्धी महामार्गासाठी सुरू असलेल्या शेती संपादन प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या विविध समस्या व मागण्यांचा आढावा घेण्यासाठी खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांच्या पुढाकाराने जिल्हाधिकारी कार्यालय, भंडारा येथे आढावा बैठक आयोजित करण्यात आली.
या बैठकीत खासदार डॉ. पडोळे यांनी प्रशासनासमोर शेतकऱ्यांच्या हिताचे अनेक महत्त्वाचे मुद्दे मांडले. उपविभागीय कार्यालयाकडून देण्यात आलेल्या नोटिसांमध्ये ७/१२ उताऱ्यानुसार स्पष्ट माहिती नसल्याने शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण होत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यास ७/१२ उताऱ्यानुसार स्वतंत्र वस्पष्ट नोटीस देण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली. तसेच संबंधित शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीच्या मोबदल्याबाबत प्रतिहेक्टर मिळणाऱ्या रकमेची स्पष्ट माहिती देण्यात यावी आणि शेतकऱ्यांची संमती व माहिती घेतल्याशिवाय शेती संपादनाची पुढील प्रक्रिया करू नये, असेही त्यांनी सांगितले.
मागील काही दिवसांत करण्यात आलेल्या पंचनाम्यांमध्ये अनेक त्रुटी असल्याचे शेतकऱ्यांनी निदर्शनास आणून दिले असल्याने झाडे, विहिरी, बोअरवेल व इतर साधनसुविधांच्या नोंदींची पुन्हा तपासणी करून आवश्यक त्या दुरुस्त्या करण्यात याव्यात, अशी मागणी खासदार डॉ. पडोळे यांनी केली. याशिवाय काही ठिकाणी जमीन संपादनानंतर अत्यल्प क्षेत्रफळ उर्वरित राहत असल्याने ती जमीन शेतीयोग्य राहत नाही. त्यामुळे अशा उर्वरित लहान तुकड्यातील जमिनी देखील संपादित करून संबंधित शेतकऱ्यांना योग्य मोबदलादेण्यात यावा, अशी मागणीही त्यांनी केली. तसेच समृद्धी महामार्गाच्या कामादरम्यान व काम पूर्ण झाल्यानंतरही शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात ये-जा करण्यासाठी योग्य रस्ते व मार्ग उपलब्ध करून देण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी नमूद केले.
शेती संपादन प्रक्रिया सुरू झाल्यापासून ते महामार्गाचे काम पूर्ण होईपर्यंत प्रशासन, शेतकरी प्रतिनिधी व लोकप्रतिनिधी यांची संयुक्त समिती स्थापन करून उद्भवणाऱ्या समस्या तातडीने सोडविण्याचा प्रस्तावही बैठकीत मांडण्यात आला. प्रशासनाने या सर्व बाबींचा गांभीर्याने विचार करून शेतकऱ्यांना न्याय मिळेल अशा पद्धतीने आवश्यक ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.








