भंडारा शहरालगतचे १३ गावे मिळून दुसरी नगरपरिषद होणार का?
दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- भंडारा तालुक्यातील खोकरला, गणेशपूर व इतर १३ गावे मिळून नवीन नगरपरिषद निर्माण करण्याबाबत शासनाला प्रस्ताव सादर करण्यात येणार असल्याने संबंधित ग्रामपंचायत बाबत जि. प. उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) उमेश नंदागवळी यांनी भंडारा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना माहिती मागितली. विशेष म्हणजे संदर्भीय पत्रात आ. नरेंद्र भोंडेकर यांच्या दि. २७ जानेवारी २०२६ च्या पत्राचा उल्लेख करण्यात आला आहे. या पत्रावरून भंडारा शहरालगतची १३ गावे मिळून दुसरी नगरपरिषद निर्माण होणार का? असा प्रश्न उपस्थित केल्या जात आहे.
जि. प. उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) उमेश नंदागवळी यांनी दि. १२ डिसेंबर २०२६ रोजी भंडारा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना पत्र पाठविले. यात आ. नरेंद्र भोंडेकर यांचे दि. १७ जानेवारी २०२५ चे पत्र, कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन, नगर विकास विभाग, मंत्रालय मुंबई यांचे पत्र क्र. एमयुएन-२०२६/ प्र.क्र.६८/नवी-१८, दि.०४/ ०२/२०२६ व जिल्हाधिकारी भंडारा यांचे पत्र क्र. कार्या-४/ कलि-२/नपाप्र/कावि/१२३/ २०२६ दि.१०/०२/२०२६ यांंचा संदर्भ देण्यात आला आहे. भंडारा तालुक्यातील खोकरला, गणेशपूर तसेच इतर १३ गावे मिळुन नवीन नगरपरिषद स्थापन काराणेकामी महाराष्ट्र नगरपरिषद, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ मधील तरतुदीनुसार प्रस्ताव शासनास सादर करावयाचा आहे. त्याअनुषंगाने भंडारा तालुक्यातील खोकाराला, गणेशपूर, केसलवाडा, टवेपार/ खुशिपार, पंढराबोडी, सिरसी, जमनी, भोजापूर, बेला, पिंडकेपार, मुजबी, संगम, खैरी/ सालेबर्डी या गावांचा खालील नमुदप्रमाणे मुद्दे निहाय अहवाल विनाविलंब या कार्यालयास सादर करावा.
सदर ग्रामपंचायतीचे नगरपरिषदेमध्ये समावेश होण्यास तयार असल्याबाबत ग्रामपंचायतीचा ठराव/ना-हरकत प्रमाणपत्र. सदर गावांची लोकसंख्या (सन २०११ च्या जनगणनेनुसार) व सदर ग्रामपंचायतीचा कार्यकाळ, सरपंच कालावधी व एकुण सदस्य संख्या यांची तातडीने प्रस्ताव वेळेत शासनास सादर करण्यासाठी माहिती मागविण्यात आली आहे. सध्या या पत्राची सर्वत्र चर्चा सुरु आहे. या गावांच्या सभोवताल व लगत भंडारा नगर परिषद असतांना दुसरी नगरपरिषद निर्माण होणार का? पत्रातील नमूद गावे भंडारा नगर परिषद ओलांडून नवीन होणाऱ्या नगर परिषदमध्ये समाविष्ट होण्यास इच्छुक होतील का? नवीन नगर परिषद निर्माण झाल्यास त्याचे मुख्यालय कुठे राहील? पूर्वीच्या भंडारा नगर परिषद हद्दवाढीच्या प्रस्तावाचे काय? असे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. या पत्रामुळे मात्र संभ्रम निर्माण होत आहे.








