रामकाल पथ विकास प्रकल्प ते ओझर विमानतळाचा विस्तार, कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिककरांना अर्थसंकल्पातून काय मिळालं? जाणून घ्या
मुंबई:- राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असताना ६ मार्च रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर सादर होणारा हा पहिलाच अर्थसंकल्प असल्याने त्याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. या अर्थसंकल्पात नाशिक शहर आणि जिल्ह्यासाठी अनेक महत्त्वाच्या विकासकामांची घोषणा करण्यात आली असून धार्मिक पर्यटन, पायाभूत सुविधा, उद्योग आणि शेती या सर्व क्षेत्रांमध्ये मोठ्या योजना जाहीर करण्यात आल्या आहेत. नाशिकच्या धार्मिक महत्त्वाला लक्षात घेऊन त्र्यंबकेश्वर मंदिराच्या सर्वांगीण विकासासाठी विशेष तरतूद करण्यात आली आहे. देशातील१२ ज्योतिर्लिंगांपैकी पाच ज्योतिर्लिंग महाराष्ट्रात असल्याने त्यांच्या विकासासाठी पाच वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांची समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या माध्यमातून त्र्यंबकेश्वर परिसराचा पर्यटन आणि पायाभूत सुविधांच्या दृष्टीने मोठ्या प्रमाणात विकास केला जाणार आहे.








