बावनथडी धरणाच्या काठावर २० वर्षांचा वनवास

राहुल डोंगरे तुमसर (दै. लोकजन) :- तुमसर तालुक्याच्या शेवटच्या टोकावर उभे असलेले बावनथडी (राजीव सागर) धरण विकासाचे प्रतीक मानले जाते. परंतु या विकासाच्या चमकदार कहाणीच्या मागे काही कुटुंबांचे आयुष्य आजही अंधारात अडकलेले आहे. धरणाच्या काठावर कमकासुर येथील पाच आदिवासी कुटुंबे तब्बल २० वर्षांपासून वनवासासारखे जीवन जगत आहेत. विकासासाठी गावे उठली, घरे विस्थापित झाली, परंतु या कुटुंबांच्या पुनर्वसनाचा प्रश्न आजही धरणाच्या पाण्यासारखाच अधांतरी आहे.

बावनथडी धरण प्रकल्प पूर्ण करण्यासाठी सुसुरडोह, सितेकसा आणि कमकासुर ही गावे जलमय झाली. सुसुरडोह आणि सितेकसा येथील नागरिकांचे पुनर्वसन झाले; मात्र कमकासुरमधील ही पाच कुटुंबे आजही धरणाच्या काठावरच तग धरून आहेत. शासनाने त्या काळी हेक्टरीअवघे २८ हजार रुपये मोबदला देऊन जमीन संपादन केली. त्या वेळीही हा मोबदला अत्यल्प होता; आजच्या काळात तर तो केवळ उपहास वाटतो. “आदिवासींना भूमिहीन करता येत नाही’ हा कायद्याचा सिद्धांत कागदावर राहिला, परंतु प्रत्यक्षात या कुटुंबांना त्यांच्या मातीतून उपरे बनविण्यात आले. धरणाच्या काठावर असलेला परिसर घनदाट जंगलाने वेढलेला आहे. येथे वाघ, बिबट्यांसारख्या हिंस्त्र प्राण्यांचा वावर नेहमीच असतो. रात्रीच्या काळोखात या कुटुंबांच्या झोपड्यांत केवळ चिमणीचा मिणमिणता प्रकाश असतो.

वीज नसल्यामुळे दररोज भीतीच्या सावटात रात्र काढावी लागते. पिण्यासाठी फक्त एकच विहीर आहे, आणि तिथेही वन्यजीवांचा धोका कायम असतो. हिंस्त्र प्राण्यांपासून बचावासाठी झोपड्यांच्या दरवाजांना लोखंडी जाळी लावून कुटुंबे रात्र काढतात. विकासाच्या नावाखाली विस्थापित झालेल्या या लोकांचे जीवन आजही जंगलातील संघर्षासारखेच आहे. प्रशासनाने वारंवार ही जागासोडण्यास सांगितले, परंतु या कुटुंबांचा प्रश्न साधा आहे. बाहेर जाऊन काय करायचे? २८ हजार रुपयांत आजच्या काळात काय मिळते? कुटुंबांचे प्रमुख काशिनाथ ऊईके म्हणाले, विकासाच्या मोठ्या प्रकल्पात आमची आहुती दिली गेली. २८ हजार रुपये हेक्टरी मोबदला देऊन शासनाने आमची थट्टा केली आहे. आम्हाला वीज नाही, सुरक्षा नाही. श्वापदांच्या भीतीत आम्ही जगायचं की मरायचं, याचं उत्तर सरकारने द्यावं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *