वाढदिवसाच्या तीन दिवसांआधीच तरुणाचा मृत्यू
दै. लोकजन वृत्तसेवा तुमसर ः- धुलीवंदनाच्या दिवशी, ३ मार्च रोजी दुपारच्या सुमारास खापा-खरबी राष्ट्रीय महामार्गावर घडलेल्या भीषण अपघाताने संपूर्ण परिसर हादरून गेला. भरधाव कारने दुचाकीला दिलेल्या जोरदार धडकेत प्रशांत पुरूषोत्तम कांबळे (वय २९, रा. खरबी) यांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांचे दोन मित्र विकास अशोक गोमासे (२८) व भूषण गजानन सिंगनजुडे (२८) हे गंभीर जखमी झाले आहेत.
अवघ्या तीन दिवसांनंतर प्रशांतचा वाढदिवस होता. घरात वाढदिवसाच्या तयारीची चर्चा सुरू असताना काळानेच झडप घातल्याने खरबी गावावर शोककळा पसरली आहे. प्रशांत कांबळे हे आपल्या दोन मित्रांसह दुचाकीने गावाकडे परत येत असताना खरबी शिवारातील एका ढाब्यासमोर समोरून येणाऱ्या भरधाव कार(क्रमांक एमएच ३५ एजी ८११७) ने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडकेची तीव्रता इतकी होती की प्रशांतचा जागीच मृत्यू झाला. मागेबसलेले विकास व भूषण हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर भंडारा येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
घटनेचे गांभीर्य ओळखून मोहाडी पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांच्या मध्यस्थीनंतर आणि आर्थिक मदतीबाबत सकारात्मक आश्वासन मिळाल्यानंतर आंदोलनमागे घेण्यात आले व वाहतूक सुरळीत करण्यात आली. मोहाडी पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह तुमसर उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला. शवविच्छेदनानंतरमृतदेह शोकाकुल वातावरणात नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सुरेंद्र बेलखेडे व उपनिरीक्षक चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली मोहाडी पोलीस करीत आहेत. धडक देणारी कार तिरोडा येथील “बचवानी’ नामक कंत्राटदाराची असल्याची माहिती समोर आली आहे.








