शासकीय सेवेत सामावून घेण्यासह इतर मागण्यांसाठी मुंबई येथे प्रकल्पग्रस्तांचे बेमुदत आमरण उपोषण सुरु

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- महाराष्ट्रातील प्रकल्पग्रस्तांना तात्काळ शासन सेवेत सामावून घेण्यात यावे यासह इतर मागण्यांच्या पूर्ततेसाठी युवा प्रकल्पग्रस्त कृती समिती महाराष्ट्र राज्याच्यावतीने आझाद मैदान मुंबई येथे आज दि. ४ मार्चपासून बेमुदत आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे. उपोषणाच्या पहिल्याच दिवशी खा. डॉ. प्रशांत पडोळे यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेवून पाठिंबा दर्शविला. राज्यातील धरणाचे प्रकल्प किंवा अन्य प्रकल्प गेल्या ६० वर्षांपासून झाले. मात्र प्रकल्पग्रस्तांना अद्यापपर्यंत न्याय मिळाला नाही. सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा प्रकल्पग्रस्तांना ५० टक्के आरक्षण लागू करण्यात यावे असे आदेश दिले.

दि. २६ जुलै २०२३ रोजी मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली राज्य पुनर्वसन प्राधिकरण तथा राज्य पुनर्वसन व पुनस्थापन संनियंत्रित समितीच्या बैठकीत राज्यातील प्रकल्पग्रस्तांना गट “क’ व “ड’ वर्गातील अनुशेष भरून काढण्यासाठी विशेष भरती प्रक्रिया राबवावे असे निर्देश दिले होते. मात्र भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली नाही. प्रकल्पग्रस्तांना शासकीय सेवेत सामावून घेण्यात यावे, भंडारा व नागपूर जिल्ह्यातील ४२ बाधित गावाचे पुनर्वसन करण्यात यावे,

प्रकल्पग्रस्तांना आजच्या बाजारभावाप्रमाणे मोबदला देण्यात यावा, भंडारा जिल्ह्यातील खापरी कापा, अजिमाबाद, मुजबी, देवळीपार, गणेशपूर, भोजापूर, सालेबर्डी, कारधा, विटाळा, कवडशी, बेरोडी, टोला करचखेडा, नवीन जमनी, लोहारा, भंडारा खास, पाहुणगाव, खमाटा, बोटाळा, सुरबोडी, पेवठा, बोरगाव बुज., टोली इत्यादी २७ गावांचे पुनर्वसन करण्यात यावे यासह इतर मागण्यांसाठी हे बेमुदत आमरण उपोषण सुरु करण्यात आले आहे. या आंदोलनात प्रकल्पग्रसतांसोबत युवा प्रकल्पग्रस्त कृती समितीचे राज्य उपाध्यक्ष तथा भंडारा जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्तांचे नेते भाऊ कातोरे, फकीरचंद उईके, कामदेव उईके, बिसन भलावी, बाळकुसन उईके, मनोहर नैताम, श्रीचंद भलावी, सुखदेव मरसकोल्हे, कमलदास उईके, सौ. वैशाली रूपचंद गजाम, सुलोचना उईके यांच्यासह इतर सहभागी आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *