खासदारांच्या आढावा बैठकीत नागरिकांनी अधिकाऱ्यांच्या लेटलतीफीचा वाचला पाढा

दै. लोकजन वृत्तसेवा मोहाडी :- भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांच्या अध्यक्षतेखाली तहसिल कार्यालय मोहाडी येथे २६ जानेवारीला महत्त्वपूर्ण आढावा बैठक घेण्यात आली. बैठकीस उपविभागीय अधिकारी उपेश अंबादे, तहसीलदार प्राजक्ता बुरांडे, नगरपंचायत मोहाडी चे मुख्याधिकारी निलेश इंगोले, भूमि अभिलेख कायालयाचे अधिकारी, कर्मचारी व सर्व पोलिस स्टेशनचे ठाणेदार, खंडविकास अधिकारी तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत नागरीकांनी मोहाडी शहर व तालुक्यातील प्रलंबित महसुली व नागरी समस्यांवर अधिकारी कर्मचारी कशी लेटलतीफी करतात, कार्यालयाच्या वारंवार चकरा कश्या मारायला लावतात याबाबत अनेक प्रश्नांचा भडीमार केला. यावर खासदारांनी अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले.

आबादी प्लॉटवरील अतिक्रमणधारक, चालता नंबरवरील घरमालक, शासकीय जमिनीवरील अतिक्रमणधारक तसेच जंगल झुडपी जमिनीवरील अतिक्रमणधारक यांना नियमानुसार पट्टे देण्याबाबत सकारात्मक आश्वासन देण्यात आले. संबंधित विषयांवर प्रशासनाने आवश्यक ती कार्यवाही करून मार्ग काढण्याचा निर्धार व्यक्त केला. खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांनी नागरिकांच्या अडचणी समजून घेत तातडीने तोडगा काढण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. सर्व विभागांनी समन्वयाने काम करून सर्वसामान्यांना न्याय देण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी मोहाडी तालुका कॉग्रेस अध्यक्ष राजेश हटवार, शहर अध्यक्ष विजय शहारे, माजी जि. प. अध्यक्ष आशिष पात्रे, जि. प. सदस्य देवा इलमे, अमित खोब्रागडे, अस्पाक सय्यद, रवी थोटे, गीता बोकडे, देवश्री शहारे, शोभा बुरडे तसेच इतर पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या आढावा बैठकीमुळे मोहाडी शहरातील अनेक प्रलंबित प्रश्न मार्गी लागण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *