शिरपूर आरटीओ चेक पोस्टवरील अवैध वसुलीचा सिंडिकेट पुन्हा उघड

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा ः- भंडारा, गोंदिया लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांनी २८ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवरील शिरपूर येथील आरटीओ चेक पोस्ट येथे अवैध वसुली होत असल्याबद्दल ट्रकचालकांची तक्रार होती. त्यामुळे दि. २८ फेब्रुवारी रोजी या अवैध वसुलीच्या प्रकाराची पुन्हा पाहणी केली. यावेळीही ट्रक चालकांकडून खुलेआम पैसे घेतले जात असल्याचे प्रत्यक्ष पाहिले असल्याची माहिती खा. डॉ. प्रशांत पडोळे यांनी आज पत्रपरिषदेत दिली. खा. पडोळे पुढे म्हणाले, हा प्रकार पूर्णपणे सिंडिकेट पद्धतीने चालणारी संघटित वसुलीचा आहे. आरटीओ कार्यालयाच्या खिडकीतून स्टॅम्पच्या नावाखाली ५०० ते १५०० रुपयांपर्यंत रोख रक्कम घेतली जात आहेत. या पैशाचा अधिकृत आदेश काय आहे आणि त्याचा हिशोब कुठे जातो, याची माहिती प्रशासनाने तात्काळ जाहीर केली पाहिजे.

या वसुलीला विरोध करणाऱ्या काही ट्रक चालकांना मारहाण केली जाते. भीती निर्माण करण्यासाठी काही गावगुंड लाठ्या घेऊन उभे असतात, अशी तक्रार ट्रकचालकांनी केलेली आहे. या भीतीपोटी मागील तितकी रक्कम द्यावी लागते असे ट्रकचालकांनी सांगितले. या प्रकरणात संबंधित अधिकारी, कर्मचारी व स्थानिक घटकांच्या संगनमताशिवाय एवढ्या मोठ्या प्रमाणात वसुली शक्य नाही. आतापर्यंत दोनदा तक्रार करून देखील जेव्हा कारवाई झाली नाही. महाराष्ट्र राज्याच्या टोकावर असलेल्या या चेक पोस्टवरून ट्रक शेजारील छत्तीसगड राज्यात प्रवेश करतात इथून जाणाऱ्या मालवाहतूक ट्रक चालकांकडून नियमांच्या नावाखाली अतिरिक्त रक्कम उकळली जात आहे. यामुळे चालक आणि वाहनमालकांना आर्थिक फटका बसत असून वाहतूक व्यवसायावर त्याचा विपरीत परिणाम होत आहे. पारदर्शक कारभार व्हावा आणि दोषींवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी केली. आरटीओ अधिकाऱ्यांनी ट्रक चालकांन कडून अवैध रित्या पैसे वसुल करण्यासाठी काही स्थानिक लोकांना चेक पोस्ट वर कामाला ठेवले आहे.

ज्यांचे पोटापाण्याच्या प्रश्न या कामातूनच निभावले जातो त्यांनी आपल्या घरातील महिला आणि मुलांना बोलावून आपला घेराव केला. चेक पोस्ट परिसरातील सीसीटीव्ही फुटेज जप्त करून चौकशी करावी, तसेच संबंधित अधिकाऱ्यांच्या कॉल डिटेल्स आणि आर्थिक व्यवहारांची तपासणी करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. खासदारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सविस्तर पत्र पाठवून उच्चस्तरीय चौकशी समिती नेमण्याची, दोषींवर गुन्हे दाखल करण्याची आणि सध्या कार्यरत अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करण्याची मागणी केली आहे. जोपर्यंतही अवैध वसुली थांबत नाही, तोपर्यंत मी स्वतः छावणी टाकून तिथे थांबेल. ती आंदोलन करायला मागे हटणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *