तुमसर उपविभागात अवैध दारू व्यवसायावर पोलिसांचा आघात
दै. लोकजन वृत्तसेवा तुमसर :- अवैध दारू निर्मितीला आळा घालण्यासाठी तुमसर उपविभागीय पोलिसांनी पुन्हा एकदा धडक कारवाई करत नवरगाव शेतशिवारातील नाल्याकाठावर सुरू असलेला अवैध गाळप व्यवसाय उद्ध्वस्त केला. या कारवाईत तब्बल १ लाख ८ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून मुख्य संशयित इसम अंधाराचा फायदा घेत पळून जाण्यात यशस्वी झाला. उपविभागीय पोलीस अधिकारी, तुमसर यांच्या आदेशानुसार अधिकारी व अंमलदार हे खाजगी वाहनाने पेट्रोलिंग करत असताना गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार मौजाउमरवाडा येथील दोन महिला पंचांना सोबत घेऊन नवरगाव शेतशिवारातील नाल्याच्या काठावर दुपारी सुमारे १ वाजता छापा टाकण्यात आला.
झाडीझुडपात सुरू असलेल्या हालचाली पाहून पोलिसांनी परिसराला वेढा घातला. यावेळी एक इसम घटनास्थळी दिसून आला; मात्र पोलिस व महिला पंचांना पाहताच त्याने नाल्यातून पाण्यातूनच दुसऱ्या काठावर धाव घेतली. महिला पंचांनी त्याची ओळख लक्ष्मण मदन गुर्वे (वय अंदाजे ४५ वर्षे, रा. नवरगाव) अशी पटवून दिली. पाण्याचा अडथळा असल्याने तो पसार झाला. घटनास्थळी अवैध दारू निर्मितीसाठी साठवून ठेवलेले साहित्य आढळले. यात लोखंडी ड्रम, टिनाचे पिपे, जळाऊ लाकूड, ६० किलो गूळ तसेच १,००० किलो सडवा मोहाफुल रसायन असा एकूण १,०८,८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
रसायनाचा नमुना पंचांसमक्ष वेगळा काढून सीलबंद करण्यात आला असून उर्वरित साहित्य नष्ट करण्यात आले. सदर कारवाई पोलीस अधीक्षक, भंडारा व अप्पर पोलीस अधीक्षक, भंडारा यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी, तुमसर यांच्या नेतृत्वात पार पडली. अवैध दारू व्यवसायाविरोधात पोलिसांनी कठोर भूमिका घेतली असून अशा बेकायदेशीर कृत्यांबाबत नागरिकांनी तत्काळ माहिती द्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.









