छत्रपती शिवाजी समाधान शिबीर अभियानाचा लाभ घ्यावा
दै. लोकजन वृत्तसेवा भंडाराः- सर्वसामान्य जनता व शेतकरी यांचे महसूल विभागांतर्गत क्षेत्रीय कार्यालयांशी संबंधित दैनंदिन प्रश्न सत्वर निकाली काढणे, महाराष्ट्र जमिन महसूल संहितेच्या नवीन तरतुदींची जनजागृती करणे/ प्रभावी अंमलबजावणी करणे, डिजिटल सेवांचा जास्तीत जास्त वापर सुनिश्चित करणे, नागरिकांना सेवा पुरविणे या उद्देशाने माहे मार्च ते माहे मे या कालावधीमध्ये जिल्ह्यातील ४१ महसूल मंडळ स्तरावर तसेच नगर परिषद/नगर पंचायत पातळीवर “छत्रपती शिवाजी समाधान शिबीर अभियान टप्पा १’ राबविण्यात येत आहे. जनता व शेतकरी यांनी या अभियानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी सावनकुमार यांनी केले आहे.
जिल्हाधिकारी पुढे म्हणाले, या अभियानात अद्यावत नोंदीसह ७/१२ दुरुस्ती करणे, तुकडेबंदीकायद्याची अंमलबजावणी, विद्यार्थ्यांना लागणारे दाखले वाटप करणे, वर्ग २ चे वर्ग १ करणे, सर्वांसाठी घरे अंतर्गत पट्टे नियमाकुल करणे, प्रलंबित असलेले फेरफार निकाली काढणे, ७/१२ मधील चुकांसंदर्भात अर्ज स्वीकारणे, आवश्यक कागदपत्रांची तपासणी, त्रुटी सूची देणे व तात्काळ करता येणाऱ्या दुरुस्त्याची नोंद घेणे, तात्काळ सेवा उत्पन्न प्रमाणपत्र, रहिवासी अधिवास प्रमाणपत्र, जातीचे प्रमाणपत्र, नॉन-कीमीलेअर प्रमाणपत्र इत्यादीबाबत अर्ज स्विकारणे तसेच पुर्वी प्राप्त अर्जाच्या अनुषंगाने प्रमाणपत्र वितरीत करुन अकृषक तरतुदीसंदर्भातील सुधारणा बाबत मार्गदर्शन करणे आदी कामे करण्यात येणार आहेत. महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम सुधारणा अधिनियम, २०२५ नुसार कलम ४२ मध्ये मूलभूत बदल करण्यात आला आहे.
आता अंतिम विकास आराखडा किंवा प्रादेशिकयोजनेत समाविष्ट असलेल्या जमिनीचे अकृषिक रूपांतरण करण्यासाठी जिल्हाधिकारी यांची स्वतंत्र परवानगी आवश्यक नाही, विकास आराखडा/ प्रादेशिक योजना मंजुरी हीच अकृषिक परवानगी समजली जाईल. या अभियानादरम्यान नागरिकांना या नवीन तरतुदीबाबत माहिती देणे, विकास आराखडा/ प्रादेशिक योजना असलेल्या जमिनींच्या गैरकृषी प्रक्रियेबाबत मार्गदर्शन करण्यात यावे. नवीन सुधारणेनुसार कलम ४२ अ, ४२ ब, ४२ क व ४२ ड या सर्व तरतुदी रद्द करण्यात आल्या आहेत. यामुळे मिळकतधारकांना मोठा फायदा झाला आहे. अभियानादरम्यान ज्या नागरिकांना अद्याप सनद मिळालेले नाही. अशा जुन्या प्रकरणांची माहिती घेऊन त्यांना नवीन व्यवस्थेबाबत माहिती देण्यात येईल, असेही जिल्हाधिकारी म्हणाले.









