गटग्रामपंचायत कवलेवाडा येथे गृहलक्ष्मी योजनेस धडाक्यात सुरुवात
दै. लोकजन वृत्तसेवा पालांदूर :- मुख्यमंत्री पंचायतराज अभियान अंतर्गत विशेष नाविन्यपूर्ण उपक्रम गृहलक्ष्मी योजनेची सुरुवात करण्यात आली. महिलांचा समाजात सन्मान व्हावा. घराघरात कन्येचे जन्मतः स्वागत व्हावे. तिला तिच्या जीवनात आर्थिक बळ मिळावे. अशा विविध अर्थाने ग्रामपंचायत कवलेवाडा अंतर्गत २०२५ या वर्षात कन्यारत्न जन्मलेल्या कुटुंबाला एक हजार रुपयाचे अनुदान देण्याचे नियोजन पार पडले.
यावेळी ही योजना निरंतर सुरू राहण्याचा आशावाद सरपंच मनीषा स्वप्निल खंडाईत यांनी व्यक्त केला. मिळणारे अनुदान हे दैनंदिन खर्चात खर्च न करता त्या मुलीच्या भविष्याकरिता उपयोगी पडावे याकरिता जवळच्या डाक कार्यालयात सुकन्या समृद्धी योजनेचे खाते उघडावे व त्यात ग्रामपंचायत मार्फत पहिला हप्ता एक हजार रुपयाचा भरणा करण्याचा निर्णय ग्रामपंचायतच्या वतीने सर्वानुमते घेण्यात आला. यात पहिल्या टप्प्यात पाच मुली पात्र असून त्यांच्या पालकांना रोपटे देऊन यथोचित सन्मान करण्यात आला. कदाचित आपल्या भंडारा जिल्ह्यात हा अभिनव व स्तुत्य उपक्रम पहिलाच असावा.
ग्रामस्थांनी ग्रामपंचायतच्या या निर्णयाचे कौतुक केले. यावेळी सरपंच मनीषा स्वप्निल खंडाईत, उपसरपंच प्रमोद भुते, ग्रामपंचायत सदस्य डॉ. आशिष गभणे, रामकृष्ण मेश्राम, चेतना जवंजार, देवांगना कहालकर, संगीता खंडाईत, कुमुद बडोले, पालक टेमराज कानतोडे, काजल शेंडे, निखिल खंडाईत, मयुरी शेंडे, ग्राम पंचायत अधिकारी प्रदीप चेटूले, संगणक परिचालक सतीश हजारे, राजश्री धर्मशहारे व लाभार्थी उपस्थित होते.









