शिक्षण विभागातील १८१ पैकी फक्त १४ दिव्यांगांचाच पडताळणी अहवाल प्राप्त

काशिनाथ ढोमणे भंडारा (दै. लोकजन)ःभंडारा जिल्हा परिषद शिक्षण विभागातील १८१ दिव्यांग अधिकारी व कर्मचाऱ्यांपैकी १६७ कर्मचाऱ्यांचा अद्यापपर्यंत दिव्यांग प्रमाणपत्र पडताळणी शिक्षण विभागाकडे प्राप्त झालाच नाही. फक्त १.०८ टक्के कर्मचाऱ्यांचाच अहवाल प्राप्त झाला आहे. यामुळे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) रवींद्र सोनटक्के यांनी ३० दिवसात दिव्यांग अधिकारी व कर्मचारी यांनी संबंधीत अहवाल सादर न केल्यास मार्च महिन्याचे वेतन काढण्यात येणार नाही, असे पत्र दि. २४ फेब्रुवारी २०२६ रोजी काढले आहे.

सविस्तर असे की, दिव्यांग कल्याण विभागाच्या दि. ९ ऑक्टोंबर २०२५ च्या आदेशान्वये जिल्ह्यातीलच नव्हे तर राज्यातील सर्व विभागातील दिव्यांग अधिकारी व कर्मचारी यांच्या दिव्यांग प्रमाणपत्राची पडताळणी करण्यास कळविले आहे. त्यानुसार संबंधित विभाग प्रमुखांनी पत्र काढून त्यांच्या अधिनस्थ दिव्यांग अधिकारी व कर्मचारी यांनी त्यांच्या प्रमाणपत्राची जिल्हा शल्य चिकित्सक भंडारा यांचेकडून किंवा ज्यांचे प्रमाणपत्र ज्या जिल्ह्यातील असतील त्याजिल्ह्यातील जिल्हा शल्य चिकित्सकांकडून पडताळणी करून तसा अहवाल सादर करण्याचे कळविले होते. असे असतांनाही अनेक दिव्यांग अधिकारी व कर्मचारी यांनी या आदेशाकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे.

जि. प. भंडाराचे प्राथमिक शिक्षणाधिकारी रवींद्र सोनटक्के यांनी दि. २४ फेब्रुवारी रोजी गटशिक्षणाधिकारी व संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांना पाठविलेल्या पत्रानुसार जिल्हा परिषद शिक्षण विभागातील १८१ दिव्यांग अधिकारी व कर्मचाऱ्यांपैकी १६७ कर्मचाऱ्यांनी अद्यापपर्यंत त्यांचे दिव्यांग प्रमाणपत्र पडताळणी केल्याचा अहवाल सादर केला नसल्याचे स्पष्ट नमूद आहे. जिल्हा परिषद हायस्कूलमधील १४ पैकी १४ ही दिव्यांग कर्मचाऱ्यांनी प्रमाणपत्र सदर केलेनाही, हे विशेष. संबंधित जिल्हयातील दिव्यांग बोर्डकडून दिव्यांगत्व प्रमाणपत्राची तपासणी करून अहवाल ३० दिवसात कार्यालय प्रमुखाकडे सादर करावा अन्यथा त्यांचे माहे मार्च २०२६ चे वेतन अदा करण्यात येणार नाही, असे शिक्षणाधिकारी यांनी पत्रात नमूद केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *