नवजात बाळ विकत घेणाऱ्या मालती वाघमारे हिला अटक
दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- भंडारा जिल्ह्यातील पांढराबोडी येथील मालती प्रकाश वाघमारे (वय ४४) या महिलेला गोंदिया येथील टोळीने नवजात बाळाची विक्री केली. या प्रकरणी सहा आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यापैकी पाच आरोपींना पूर्वीच अटक करण्यात आली. तर आज बाळ विकत घेणारी मालती प्रकाश वाघमारे हिला पोलिसांनी अटक केली. महिला व बाल विकास विभाग भंडारा अंतर्गत चाईल्ड हेल्प लाईन टोल फ्री क्रमांक १०९८ वर दि. २ फेब्रुवारी रोजी मालती वाघमारे यांचेकडे नवजात बाळ असल्याची तक्रार प्राप्तझाली होती.
यावरून चाईल्ड हेल्प लाईनचे समन्वयक सौ. लोकप्रिया देशभ्रतार व त्यांचे कार्यालयीन पथक यांनी मालती वाघमारे हिची भेट घेतल्यानंतर हा प्रकार समोर आला होता. तक्रारीनंतर नवजाळ बाळ विक्री प्रकरणी पोलीस स्टेशन वरठी येथे गोंदिया येथील डॉ. नितेश नरेंद्रकुमार वाजपेयी (वय ४०), मालती प्रकाश वाघमारे रा. पांढराबोडी ता.भंडारा, ललेश्वर नंदकिशोर सादेपाच (३९) रा. रामनगर गोंदिया, पौर्णिमा सतिश धुर्वे (वय ३०) रा. रामनगर गोंदिया, उमेशसिंग रामचंद्रसिंग गडलोत (वय ४८) रा. गोंदिया व सागर सिक्का रा. गोंदिया यांचेवर कलम १४३ (४), १३७ (२), ३ (५) भा. न्या.सं. सहकलम ८०, ८१ अल्पवयीन न्याय (मुलाची काळजी व संरक्षण) कायदा २०२५ अन्वये दि. ६ फेब्रुवारी रोजी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस अधीक्षक नुरुल हसन, अप्पर पोलीस अधीक्षक निलेश मोरे यांचे मार्गदर्शनात साकोलीचे उपविभागीय पोलीस अधिकारी शिवम विसापुरे हेकरीत आहेत. तपास अधिकारी शिवम विसापुरे यांनी या प्रकरणाचा विस्तृत तपास करून पाच आरोपींना अटक केली. तर बाळ विकत घेणारी महिला मालती वाघमारे हिला आज अटक करण्यात आली.









