साकोलीत “पोलीस मित्र’ आले तब्बल ३८ वर्षांनंतर एकत्र
दै. लोकजन वृत्तसेवा साकोली :- वर्दीत राहून संपूर्ण आयुष्य वर्दीतच घालवून तर कधी कधी कुटुंबीयांना वेळही देता येत नाही असा एक शासकीय विभाग म्हणजेच पोलीस विभाग या विभागात संपूर्ण आयुष्य खपवून काहीजण निवृत्त झाले तर काही निवृत्तीच्या उंबरठ्यावर असताना साकोली येथे नुकताच पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या भावनिक सहकुटुंब कार्यक्रम साजरा करण्यात आला यावेळेस वेगवेगळ्या ठिकाणाहून आलेले पोलीस अधिकारी कर्मचारी मित्र एकमेकांना कुटुंबासहित भेटून भारावून भावनिक होऊन गेले हे विशेष. सन १९८८ ची बॅचला पोलीस दलात रूजू होणारे पोलीस कर्मचारी तब्बल ३८ वर्षानंतर साकोलीत एकत्र आले.
यात कुणी निरीक्षक, उपनिरीक्षक, अधिकारी आणि पोलीस हवालदार हे आपल्या कुटुंबांसह ( रवि. २२ फेब्रु.) ला अनोख्या स्नेहमिलन सोहळ्याला उपस्थित झाले होते. तर महिला पोलीस मित्र कुटुंबियांनी विविध स्पर्धा घेऊन या सोहळ्याचा आनंद द्विगुणित केला होता. महाराष्ट्र पोलीस फ्रेन्ड्स ग्रुप “भंडारा गोंदिया’ तर्फे हा स्नेह मिलन सोहळा साकोली येथील सभागृहात आयोजित करण्यात आला. येथे २२ फेब्रुवारी १९८८ च्या बॅचमधील एकत्र भरती झालेले पोलीस कर्मचारी आपल्या परीवारांसह सम्मिलीत झाले होते. प्रसंगी मंचावर सिद्धेश्वर थोटे, वसंतराव कठाणे, अोंकार श्रीवास, मनोहर इस्कापे, नत्थु मेश्राम आदी उपस्थित होते. येथे काही ज्येष्ठ सेवानिवृत्त पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. महिलांनी सुद्धा एकमेकींना भेटवस्तू देऊन गौरव केला. कुटूंबातील सदस्यांनी येथे विविध गीतगायन व विविध खेळांच्या स्पर्धा आयोजित केल्या व या सोहळ्याचा आनंद द्विगुणित केला. “भंडारा गोंदिया पोलीस मित्र समुह’ आयोजित या स्नेह मिलन कार्यक्रमात संचालन माधव वनवे तर आभार प्रदर्शन ग्यानीराम गोबाडे यांनी केले. प्रसंगी नागपूर, भंडारा, गोंदिया, साकोली, लाखनी, तुमसर, चिचगड, तिरोडा, दिघोरी, अजर्ूनी मोरगाव येथून आलेल्या सर्व ३६ पोलीस मित्र परीवारातील सेवानिवृत्त, आजी माजी पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षक, पोलीस नायक, हवालदार यांचा स्नेह मिलन व सत्कार सोहळा संपन्न झाला.









