घरकुलच्या नावावर जोमात रेती चोरी

दै. लोकजन वृत्तसेवा मोहाडी :- घरकुल लाभार्थ्यांना पाच ब्रास रेती मोफत देण्याची शासनाची योजना आहे. परंतु त्या योजनेला सुरुंग लावत महसुल कर्मचाऱ्यांच्या संरक्षणात रेती घाटातून मोठ्या प्रमाणात रेती चोरी करणाऱ्यांना रेती चोरीची मुभा दिली जात असल्याची चर्चा आहे. मोहाडी तालुक्यातील रोहा, मुंढरी, निलज (बुज), देव्हाडा (बुज) या घाटांवरून घरकुल धारकांना पाच ब्रास रेती देण्यात येत आहे. परंतु रेती घाटावर ज्या महसुल कर्मचाऱ्यांची रेती देण्याकरिता नियुक्ती केली आहे ते कर्मचारी रेती चोरांशी हात मिळवणी करून विना रॉयल्टी चोरीने रेती नेण्याची मुभा स्थानीय ट्रॅक्टर वाल्यांसाठी सुरू आहे.

बाहेर गाऊन आलेल्या ट्रॅक्टर वाल्यांसाठी ही मुभा देण्याचीयोजना नाही. देव्हाडा येथील सात, आठ स्थानीय ट्रॅक्टर मालक नदीत जाऊन सरळ विना रायल्टीने रेती भरतात आणि दिवसा ढवळ्या रेती काढून ग्रामपंचायत मागे रेती साठवूनठेवतात व रात्री संधी साधून टिप्पर भरून रेतीची विक्री करतात. ही बाब सर्व जनतेला माहीत आहे परंतु तहसीलदार, मंडळ अधिकारी, तलाठी, करडीचे ठानेदार यांना माहीत नाही काय? निलज (बुज), मुंढरी (बु.) घाटावर अशीच परिस्थिती असून त्या ठिकाणी रेती साठी अनेक वेळा भांडणे झाली या संधीचा लाभ महसूल आणि पोलीस कर्मचारी, अधिकारी घेत आहेत. ज्या घरकुल धारकांच्या नावे रेती देण्यात आली त्यांतील अनेकांची घरे पूर्ण झालेली आहेत तर ज्यांचे बांधकाम अपुर्ण आहे अश्या काही घरकुल धारकांची रेती भलत्याच व्यक्तीने उचल केल्याची तक्रार आहे. आताही असाच सावळा गोंधळ सुरु आहे. काही घरकुल धारकांच्या नावे दोनदा रेती उचलल्याची माहिती आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *