रेती वाहतुकीवर नियंत्रणाचा अभाव, ट्रॅक्टरसह ट्रॉलींना मोकळे रान..!

दै. लोकजन वृत्तसेवा पालांदूर :- परिसरात सध्या रेती वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरट्रॉलींची संख्या लक्षणीय वाढली असून, त्यावर पोलिस व महसूल विभागाचे कोणतेही ठोस नियंत्रण नसल्याचे चित्र दिसून येत आहे. भरदिवसा व रात्री बेधडकपणे भरधाव वेगाने होणारी ही बेकायदा विना रॉयल्टी विना पास रेती वाहतूक नागरिकांच्या सुरक्षेसाठी धोकादायक ठरत आहे. विशेषतः गावातील वदर्ळीचे चौक, शाळा परिसर आणि बाजारपेठ भागात या ट्रॅक्टर ट्रॉलींची मोठ्या वेगाने होणारी वाहतूक अपघातांना आमंत्रण देत असल्याचे चित्र आहे.

पालांदूर परिसराच्या मऱ्हेगाव येथील रेती घाटातून पालांदूर येथील मुख्य मार्गाने, पोलीसठाण्यासमोरून, मंडळ अधिकारी कार्यालया समोरून तसेच मऱ्हेगाव (नवीन)मरेगाव(जुना)- ढिवरखेडागोंदी-पहाडी या छुप्या आड मार्गाने रेती वाहतूक करणारे ट्रॅक्टर सुसाट वेगाने धावत असून अपघाताची दाट शक्यता निर्माण झाली आहे. अनेक ट्रॅक्टर-ट्रॉलींत क्षमतेपेक्षा अधिक रेती भरली जात असल्याचे दिसून येते. यातील सर्वच वाहनांवर क्रमांक फलक नसणे, सिग्नल दिवे बंद किंवा सुरक्षा उपायांचा अभाव असणे ही गंभीर बाब आहे. त्यामुळे दुचाकीस्वार,पादचारी आणि शालेय विद्यार्थ्यांच्याजीवितास धोका निर्माण होत आहे.

ट्रॅक्टर अपघातात एखाद्याचा अपघात होऊन मृत्यू झाल्यास प्रशासनासह पोलिस व महसूल विभाग जबाबदारी घेईल काय?असा उद्विग्न सवाल नागरिकांकडून प्रशासनास विचारला जात आहे. विशेष बाब म्हणजे पालांदूर व परिसरातील केली जाणारी रेती वाहतूक ही विना रॉयल्टी व विना पास केली जात असून या रेती वाहतूक करणाऱ्या कित्येक ट्रॅक्टर चालकांकडे वाहन चालविण्याचा परवानाच नाही व कित्येक ट्रॅक्टर चालक अल्पवयीन देखील असल्याची विश्वसनीय माहिती आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांकडून वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून ठोस कारवाई होत नसल्याची खंत व्यक्त केली जात आहे. रेती वाहतुकीसाठी निश्चित वेळ, मार्ग आणि कडक तपासणीची अंमलबजावणी करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *