१७ वर्षीय विद्यार्थिनीची गळफास घेऊन आत्महत्या
दै. लोकजन वृत्तसेवा सिहोरा :- भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातील सितासावंगी परिसरात आज एक अत्यंत हृदयद्रावक घटना घडली आहे. येथील एका १७ वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीने राहत्या घरी गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवल्याने संपूर्ण परिसरात खळबळ माजली असून हळहळ व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मानवता संजय चौरे (१७) असे मृत मुलीचे नाव आहे. मानवता ही सितासावंगी येथील “मॉयल लिमिटेड’ च्या १०० क्वार्टर बिल्डिंगमध्ये आपल्या कुटुंबासह वास्तव्यास होती.
गुरुवार दि. १९ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास, जेव्हा घरात कुणीही नव्हते किंवा कुणाचे लक्ष नव्हते, अशावेळी तिने आपल्या खोलीत गळफास लावून आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच गोबरवाही पोलीस स्टेशनचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला आणि उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठवला आहे. एका उमलत्या वयातील मुलीने इतके टोकाचे पाऊल का उचलले, याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. घटनास्थळावरून कोणतीही सुसाईड नोट मिळाल्याची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. याप्रकरणी गोबरवाही पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू केला आहे. या घटनेमुळे सितासावंगी परिसरात शोककळा पसरली असून, स्थानिक नागरिकांकडून चिंता व्यक्त केली जात आहे. एका तरुण मुलीचा असा दुर्दैवी अंत झाल्याने चौरे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.









