साकोली विधानसभा क्षेत्रातील २८ अंगणवाडी इमारतींच्या बांधकामास मंजुरी
दै. लोकजन वृत्तसेवा साकोली :- विधानसभा क्षेत्रातील बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलत लाखणी, लाखांदूर व साकोली तालुक्यातील नागरी भागातील २८ अंगणवाडी केंद्रांच्या नव्या इमारत बांधकामासाठी तब्बल ३.१५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
प्रति अंगणवाडी ११.२५ लाख रुपये या प्रमाणे सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात निधी वितरीत होणार असून हा निर्णय महिला व बाल विकास विभागाच्या शासन निर्णयाद्वारे १७ फेब्रुवारी २०२६ रोजी जाहीर करण्यात आला. महाराष्ट्र विधानसभेच्या जुलै २०२५ अधिवेशनात आमदार नाना पटोले यांनी नियम २६४(५) अन्वये अंगणवाडी बांधकामाचा मुद्दा उपस्थित करून निधीची ठोस मागणी केली होती. त्यानंतर झालेल्या बैठकीतील निर्देश व संबंधित अधिकाऱ्यांच्या प्रस्तावाच्या आधारे हा निधी मंजूर करण्यात आला आहे.
सदर निधी मागणी क्र. एक्स-०१, २२३६-पोषण आहार अंतर्गत “अंगणवाडी इमारत बांधकाम’ या लेखाशीर्षाखाली वितरीत करण्यात येणार असून अंमलबजावणीची जबाबदारी आयुक्त, एकात्मिक बाल विकास सेवा योजना, नवी मुंबई यांच्याकडे राहणार आहे. बांधकाम नमुना आराखड्यानुसार व निर्धारित कालमर्यादेत पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मतदारसंघातील पायाभूत सुविधा, शिक्षण व बालकल्याण क्षेत्रात सातत्याने निधी उपलब्ध करून देत विकासकामे मार्गी लावण्याचा आमदार नाना पटोले यांचा प्रयत्न कायम असून, या निर्णयामुळे स्थानिक बालकांना सुरक्षित व सुसज्ज अंगणवाडी सुविधा उपलब्ध होणार असल्याने समाधान व्यक्त होत आहे.









