भंडाऱ्यात चिमुकल्यांचा “शाळा वाचवा’ चा एल्गार
दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा ः- राज्यातील १८ हजारांहून अधिक मराठी शाळा कमी पटसंख्येच्या नावाखाली बंद करण्याच्या निर्णयाविरोधात भंडाऱ्यात संताप उसळला. ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन च्या नेतृत्वाखाली आज विद्यार्थी व पालकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर जोरदार मोर्चा काढत शासनाच्या धोरणाविरोधात तीव्र एल्गार पुकारला. हुतात्मा स्मारक, शास्त्री चौक येथून निघालेला मोर्चा घोषणांनी दणाणून गेला. आम्हाला दप्तर नाही शिक्षक पाहिजे, शिक्षण आमचा हक्क आहे, शाळा बंदीचा निर्णय रद्द करा अशा घोषणांनी संपूर्ण शहर दुमदुमले. मोर्चाचे विशेष आकर्षण ठरले ते शेकडो चिमुकले विद्यार्थी.
आपल्या शाळा वाचल्या पाहिजेत या भावनेने अनेक बालके पालकांसह मोर्चात सहभागीझाली होती. काही विद्यार्थ्यांनी विविध महामानवांची वेशभूषा परिधान करून शासनाला जणू शिक्षणाच्या मूल्यांची आठवण करून दिली. मोर्चाचे नेतृत्व ए.आय.एस.एफ. चे राज्याध्यक्ष वैभव चोपकर यांनी केले. सभेत बोलताना त्यांनी शासनाच्या धोरणावर जोरदार हल्लाबोल केला. ज्या गावांची लोकसंख्या कमी आहे, तिथे पटसंख्येचे निकष पूर्ण करायचे कुठून? शासन प्रवास भत्ता देण्याच्या गप्पा मारते; पण ज्या गावात रस्तेच नाहीत, तिथे बस कशी जाईल? जिथे इंटरनेट सुविधा नाही, तिथे नवीन शैक्षणिक धोरणाचे तथाकथित “मॉडेल’ कसे चालेल? असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला. शाळा बंद करून शिक्षणाचे खाजगीकरण केले जात आहे.
उद्योगपती मित्रांसाठी स्वस्त मजूर तयार करण्याचा हा डाव आहे. भारत तरुणांचा देश आहे; पण या तरुणांना शिक्षित नागरिक बनवण्याऐवजी कारखान्यांतील स्वस्त कामगार बनवण्याचा प्रयत्न सुरू आहे, असा घणाघात त्यांनी केला. जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिल्यानंतर मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. यावेळी शालेय पोषण आहार कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष कॉम्रेड शिवकुमार गणवीर, संविधान बचाओ संघर्ष समितीचे रोशन जांभुळकर, चंद्रशेखर टेंभुर्णे, भाकतर्फे कॉम्रेड सदानंद इलमे, आजाद समाज पक्षातर्फे ज्ञानचंद्र जांभुळकर,ओबीसी तर्फे ललिता देशमुख, डॉक्टर बाळकृष्ण सार्वे, रमेश शहरे, रमेश बोरकर, चंद्रशेखर खोब्रागडे पालकांतर्फे महेंद्र मते भाग्यश्री लेनेकर अशोक नागपुरे सीमा डोंगरे इत्यादींनी आपले मनोगत व्यक्त केले. संचालन सभेचे संचालन एआयएसएफचे जिल्हाध्यक्ष कॉम्रेड विश्वजीत बनकर यांनी केले तर आभार माजी राज्य उपाध्यक्ष व भाकपचे जिल्हा सचिव कॉम्रेड हिवराज उके यांनी केले.









