तरुणांवर दाखल केलेले गुन्हे परत घ्या, अन्यथा आंदोलन
दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा ः- भंडारा शहरालगत असलेल्या खोकरला इथं शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला घेऊन वाद निर्माण असतानाचं दोन दिवसांपूर्वी काही तरुणांनी कापडानं झाकलेला शिवाजी महाराजांचा पुतळा ओपन केला. यामुळे भंडारा पोलिसांनी या प्रकरणी पाच तरुणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तरुणांवर दाखल केलेले गुन्हे वापस घ्यावे, या मागणीला घेऊन भंडाऱ्यात आज विश्व हिंदू परिषद आणि सकल हिंदू समाजच्या वतीनं पत्रकार परिषद घेत भंडाऱ्यात शनिवार दि. २१ फेब्रुवारी रोजी सकल हिंदू समाजाचा मोर्चा काढण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला.
पत्रपरिषदेत विश्व हिंदू परिषदेचे विदर्भ विभाग सहमंत्री प्रकाश पांडे, जिल्हाध्यक्ष अनिल डोंगरवार, उपाध्यक्ष भरत मल्होत्रा, सकल हिंदू समाजाचे जिल्हाध्यक्ष मयुर बिसेन, राकेश सेलोकर, विकास मदनकर, सुरेश धुर्वे, सागर कनोजे, आकाशरहांगडाले उपस्थित होते. यावेळी प्रकाश पांडे म्हणाले, चार महिन्यापूर्वी खोकरला येथे अज्ञात व्यक्तींनी छपत्रती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारला. हे प्रकरण वादग्रस्त असल्याने त्याठिकाणी पोलीस बंदोबस्त आहे.
दोन दिवसापूर्वी सकाळी ७.३० वाजता काही शिवभक्तांना पुतळ्यावर धुळ दिसल्याने व घातलेला कपडा फाटला दिसल्याने त्यांनी तो कपडा काढून पुतळा स्वच्छ केला. याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांच्या एफआयआरमध्ये चुकीची माहिती देण्यात आलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचेआराध्य दैवत आहे. ते सर्वांचे मानबिंदू आहेत. त्यांची पुजा करणे हे चुकीचे नाही. असे असतांनाही त्यांच्यावर गुन्हे दाखल करणे म्हणजे शिवभक्तांना वेठीस धरण्याचे काम पोलीस प्रशासन करीत असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. दोन दिवसात पाच तरुणांवर लावलेले गुन्हे परत घेण्यात आले नाही तर दि. २१ फेब्रुवारी रोजी विश्व हिंदू परिषद, सकल हिंदू समाज व शिवभक्तांच्यावतीने भंडारा शहरात आक्रोश रॅली काढण्यात येणार असल्याचा इशारा यावेळी देण्यात आला.









