राज्य महिला आयोगाच्या जनसुनावणीत ६६ तक्रारी

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा ः- भंडारा जिल्ह्यात आज पार पडलेल्या ‘महिला आयोग आपल्या दारी’ या उपक्रमांतर्गत आज ६६ तक्रारीची जनसुनावणी यशस्वी ठरली असून एकूण ५८ तक्रारींवर कार्यवाही करण्यात आली. राज्य महिला आयोगाच्या वतीने “महिला आयोग आपल्या दारी’ या उपक्रमांतर्गत महिलांच्या समस्या व तक्रारींचा निपटारा करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन विभागाच्या सभागृहात जनसुनावणीचे आयोजन करण्यात आले.

यावेळी राज्य महिला आयोगाच्या सदस्य सचिव नंदिनी आवडे, जिल्हाधिकारी सावनकुमार , पोलीस अधीक्षक नुरूल हसन, मुख्य कार्यकारी अधिकारी मिलींदकुमार साळवे, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी अरुण बांदुरकर,सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण मिलींद बुराडे, जिल्हा कार्यक्रम अधिकारी श्री.जोल्हे, नितीन मोहुरले यांच्यासह समुपदेशक, तक्रारदार, पॅनलमध्ये समाविष्ट विधीतज्ञ, पोलीस अधिकारी,सेवाभावी संस्थेचे प्रतिनिधी उपस्थित होते. या जनसुनावणी कार्यक्रमात महिला आयोगाची भूमिका मांडताना श्रीमती चाकणकर म्हणाल्या, कायदा, सुरक्षा व प्रशासन हे प्रत्येक नागरिकांसाठी आहे.

कायद्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी महत्वाची असून “महिला आयोग आपल्या दारी’ या उपक्रमामुळे अनेक वर्षांपासून प्रतिक्षेत तसेच प्रलंबित असलेल्या महिलांच्या तक्रारींना न्याय मिळत आहे. महिलांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी राज्य महिला आयोग कटिबद्ध असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली. आजच्या जनसुनावणीमध्ये वैवाहिक समस्या/कौंटुबिक संबंधीत ५२ तक्रारी,सामाजिक समस्या १ ,मालमत्ता/आर्थिक फसवणुक ०५,कामाच्या ठिकाणी महिलांचा होणार लैंगीक छळ ०, इतर ८ अश्या एकुण ६६ तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारींवर तातडीने कार्यवाही करण्यासाठी पोलीस विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, विधी सेवा प्राधिकरण, भरोसा सेल, दामिनी पथक, वन स्टॉप सेंटर हे सक्रिय सहकार्य करीत असतात. यावेळी आय-सी कमिटी संदर्भात २२ फेब्रुवारी २०२५ रोजी जारी शासन निर्णयाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रत्येक आस्थापनांमध्ये अंतर्गत तक्रार निवारण समिती गठीत करणे बंधनकारक असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

जिल्हाधिकारी सावनकुमार यांनी जनसुनावणीव्दारे आयोग आपल्या दारी या उपक्रमाचे स्वागत केले.महिलांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रशासन सर्वोतोपरी सहकार्य करेल,असेत्यांनी आश्वस्त केले. भंडारा जिल्ह्याच्या पोलीस प्रशासनाच्या वतीने महिलांची प्रकरणे संवेदनशीलरित्या हाताळली जात असून जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये पोलीस दलामार्फत महिलांच्या समस्यांचे निराकरण करण्यात येत आहे. सायबर बॉट,दामीनी पथक,जागर नशामुक्तीचा या उपक्रमाबददल तसेच जिल्ह्यात पोलीस प्रशासनामार्फत सायबर गुन्हे बाबत जनजागृती करण्यात येत आहे. जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये ‘भरोसा’ सेल पथक व समुपदेशन सेल पथकाद्वारे महिलांच्या समस्यांचे निराकरण करण्याचे प्रयत्न करण्यात येत आहे, असे पोलीस अधीक्षक नुरूल हसन म्हणाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सदस्य सचिव नदिंनी आवडे यांनी केले. प्रास्ताविकातून त्यांनी जनसुनावणी मागची भूमिका विषद केली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार अमिता खोब्रागडे यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *