राज्यस्तरीय बैठकीत भंडारा जिल्हयासाठी २६४ कोटीची अतिरीक्त मागणी
दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा ः- सन २०२६-२७ या वर्षासाठी भंडारा जिल्हयासाठी एकूण मागणी रू. ५२७.७१ कोटीची असून त्यापैकी जिल्हा नियोजन समितीने राज्यस्तरीय बैठकीमध्ये रू.२६४ कोटीची अत्यावश्यक अतिरीक्त मागणी शासनाकडे नोंदविली आहे. भंडारा जिल्हयातील विकासकामासाठी जिल्हा वार्षिक योजनेच्या आराखड्यात वाढ करून द्यावी अशी विनंती पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली.
मुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा वार्षिक योजनेचे आराखडे अंतिम करण्यासंदर्भात मुंबई येथे काल राज्यस्तरीय बैठक आयोजित करण्यात आली होती. सदरबैठकीस महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, वित्त व नियोजन राज्यमंत्री आशिष जैस्वाल, पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्यासोबत आमदार नाना पटोले, आमदार राजु कारेमोरे हे देखील मुंबई येथे बैठकीस उपस्थित होते.
भंडारा येथून दुरदृष्यप्रणालीद्वारे जिल्हाधिकारी सावनकुमार, जिल्हा नियोजन अधिकारी तारकेश्वरी बोरीगिडडे यांच्यासह सर्व विभागप्रमुख अधिकारी उपस्थित होते. यामध्ये प्रामुख्याने जिल्हा ग्रंथालयाचे आधुनिकीकरण, जिल्हयातील विविध पर्यटन स्थळांची प्रचार प्रसिध्दी करणे, जिल्हयामध्ये मॉडेल कार्यालये बनविणे जेणेकरून सामान्यनागरीकांना सोयी सुविधा शीध्रतेने मिळतील या कामांचा समावेश आहे.तर मुख्यमंत्री समृध्द गाव योजनेंतर्गत सहभागी झालेल्या गावांना अधिकाधिक स्वयंपूर्ण करून आदर्श गाव निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याचे श्री.भोयर यांनी सांगितले. भंडारा जिल्हा हा तलावांचा जिल्हा असून येथील रोहू, कतला, तिलापिया या माशांना प्रचंड मोठया प्रमाणात मागणी आहे, त्यास बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हयात फिश मार्केटचा प्रकल्प उभारण्याबाबत विनंती केली असता त्यास अर्थसंकल्पात समाविष्ट करणेबाबत मुख्यमंत्री महोदयांनी निर्देश दिले.
कयाकिंग व कॅनायिंग या खेळासाठी जिल्हयात अनुकूल वातावरण आहे. तरी त्याअनुषंगाने खेळाडू प्रशिक्षण संकुल बनविण्यास मंजूरी मिळणेबाबत जिल्हाधिकारी यांनी सादरीकरण केले. जिल्हयात एमआयडीसी उभारणीकरीता शासकीय जागेचा शोध घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी जिल्हाधिकारी यांना दिले. शेवटी मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी वार्षिक योजनेत रास्त वाढ देण्यात येईल असे सांगितले.









