गादिया जिल्ह्यातील विविध घटनेत चौघांचा मृत्यू …बैल धुण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा बैला सह तलावात बुडून मृत्यू
गोंदियाः- तलावावर बैल धुण्यासाठीगेलेल्या शेतकऱ्याचा एका बैलासह तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना शनिवार १४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६:३० वाजता सुमारास गोंदिया तालुक्यातील खातिया येथे घडली. महेंद्र बाबुराव कवरे (वय ४७) रा. खातिया असे तलावात बुडून मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. रावणवाडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार खातिया येथील शेतकरी महेंद्र कवरे हे शनिवारी दुपारी गावापासून काही अंतरावर असलेल्या माता मंदिर तलाव येथे बैलांना धुण्यासाठी घेऊन गेले होते.
बैलांना धुतल्यानंतर त्यांना बैलबंडीला जुंपून बाहेर काढत असताना बैलबंडीचा तोल गेल्याने महेश कवरे हे बैलबंडीसह तलावात बुडाले. ज्या भागातून महेश कवरे यांनी बैलबंडी पलटविण्याचा प्रयत्न केला त्याच भागात खोल खड्डा असल्याचे त्यांच्या लक्षात आले नाही. परिणामी महेश कवरे यांचा व त्यांच्या एका बैलाचा तलावात बुडून मृत्यू झाला. ही घटना परिसरातील नागरिकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी घटनेची माहिती रावणवाडी पोलिसांनी दिली. माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शवविच्छेदनासाठी पाठविला. महेश कवरे यांच्या पश्चात वडील, पत्नी व तीन मुली आहे. त्यांच्या मृत्यूमुळे कुटुंबीयांवर मोठे संकट कोसळले आहे.
लग्नाच्या मिरवणुकीत दुचाकीची धडक, वृद्ध महिलेचा मृत्यू, एक जखमी आमगाव तालुक्यातील दहेगाव गावात लग्नाच्या मिरवणुकीवर अनियंत्रित दुचाकीने धडक दिल्याने एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाला तर दुसरी गंभीर जखमी झाली. पोलिसांनी १४ फेब्रुवारी रोजी रात्री आरोपी दुचाकी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत महिलेचे नाव कोकिलाबाई धनलाल भुजाडे (६४) असे आहे. ती गोंदिया तहसीलमधील फुलचूर येथील रहिवासी आहे. जखमी महिलेचेनाव नव्या उदापुरे आहे. ती मध्य प्रदेशातील लिंगा येथील रहिवासी आहे. या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, १४ फेब्रुवारी रोजी आमगाव पोलिस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या दहेगाव गावात एक लग्न समारंभ आयोजित करण्यात आला होता.
रात्री ८:३० च्या सुमारास, लग्नाची मिरवणूक गावातून जात होती. मिरवणुकीत सहभागी असलेल्या कोकिलाबाई भुजाडे आणि नव्या उदापुरे रस्त्याच्या कडेला चालत होत्या. तेव्हा एक दुचाकी चालक आरोपी बळीराम ब्राह्मणकर, जो गोंदिया तहसीलमधील आवारोटोला येथील रहिवासी आहे, त्याने एमएच ३५/एक्स. २५०७ क्रमांकाच्या वाहनाने बेपर्वाईने आणि वेगाने कोकिलाबाई आणि नव्याला धडक दिली. या घटनेत कोकिलाबाईचा मृत्यू झाला, तर नव्या गंभीर जखमी झाली. आमगाव पोलिसांनी दुचाकी चालक विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.









